अवकाळीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे; द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी हताश 

पालखेड (मिरचिचे), जि. नाशिक : सतत बदलणारे वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे निफाड तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. कुंभारी येथील शेतकरी दीपक झेटे यांच्या दोन एकर द्राक्षबागेचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. 

उत्पादनात घट होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कधी थंडी तर कधी पाऊस, ढगाळ वातावरण, दाट धुके यामुळे पिकहंवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या द्राक्ष हंगामाच्या काढणीला सुरुवात झाली असून, या बदलत्या वातावरणामुळे बळीराजाला धडकी भरली आहे. द्राक्षबागांच्या काढणीवेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. निसर्गावर मात करून द्राक्षबागा तयार करणे म्हणजे तारेवरील कसरत ठरत आहे.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

उत्पादन खर्च वाढला

तालुक्यात काही ठिकाणी द्राक्षबागा वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कुंभारी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी दीपक झेटे यांच्या गट क्रमांक १६८ मधील दोन एकर क्षेत्रातील सुमारे दोनशे क्विंटल मालाला तडे गेले आहेत. या पावसाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मागीलवर्षी कोरोनामुळे मातीमोल भावाने द्राक्ष विक्री झाली. यावर्षीही वादळी वाऱ्याने द्राक्षबागांना मोठा फटका बसत असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे, अशा घडामध्ये पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्यामुळे पेपर बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मजूर खर्च, पेपर, फवारणी खर्च वाढला आहे. उसणवार करुन हा खर्च करावा लागत आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

गेल्या काही दिवसांपासून कुंभारीसह परिसरात दाट धुके व अवकाळी पावसाच्या हलक्या सरी सुरूच आहे. सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांच्या हातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, शासनाने पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. 
- दीपक झेटे, द्राक्ष उत्पादक, कुंभारी