अवकाळीमुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान; यंदा निर्यात १८६ टनांनी कमीच

नाशिक : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले असताना निर्यातीसाठी द्राक्षांचे ‘पॅकिंग’ही थांबलेले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १८६ टनांनी निर्यात कमी झाली आहे. द्राक्षांच्या काढणीला २५ जानेवारीनंतर वेग येणार असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काढणीला २५ जानेवारीनंतर वेग येणार

गेल्या वर्षीच्या हंगामात १५ दिवसांत ५१ कंटेनरमधून ६८४ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. आता १५ दिवसांमध्ये ३८ कंटेनरमधून ४९७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. जर्मनीसाठी १७, नेदरलँडसाठी १७ आणि इंग्लंडला चार कंटेनरमधून द्राक्षे रवाना झाली आहेत. यंदा निर्यातीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी २८ हजार ९२२ बागांच्या परवाना नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. शिवाय १५ हजार ९०४ बागांसाठी नव्याने परवाना अर्ज करण्यात आला आहे. महाराष्ट्राशिवाय ऑनलाइन करण्यात कर्नाटकमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

कंटेनरचे भाडे दुप्पट

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कंटेनरची चणचण भासत आहे. ही स्थिती अद्याप कायम असल्याने कंटेनरचे भाडे दुप्पट आकारले जात आहे. गेल्या वर्षी १५ टनाच्या कंटेनरसाठी दोन हजार ३०० डॉलरपर्यंत भाडे आकारले जात होते. आता चार हजार डॉलर भाडे मोजावे लागत आहे. मुळातच, कांद्यासाठी कंटेनरच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण झाल्यावर द्राक्ष उत्पादकांनी भाड्याचा तिढा कंपन्यांनी न सोडवल्यास देशांतर्गत द्राक्षे विकण्याचा इशारा दिला होता. आता आणखी दहा दिवसांनी काढणी आणि ‘पॅकिंग’ला वेग येणार असल्याने या काळात कंपन्यांनी भाड्याबद्दल निर्णायक भूमिका न घेतल्यास पुन्हा ठणकावून सांगत देशांतर्गत द्राक्ष विक्रीला सुरवात करण्याची भूमिका जाहीर केली आहे. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

निर्यातीसाठी द्राक्षांना मिळणारा भाव 
(आकडे किलोला रुपयांमध्ये) 

जर्मनी- ८५ 
नेदरलँड- ८० 
इंग्लंड- ९० 
(गेल्यावर्षीप्रमाणे भाव टिकून आहेत)  

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस