अवकाळी अन्‌ गारपिटीत दीडशे कोटींचा दणका! कांद्याचे सर्वाधिक १०० कोटींचे नुकसान

नाशिक : अवकाळी आणि गारपिटीचा कृषिपंढरीतील शेतकऱ्यांना दीडशे कोटींचा दणका बसला आहे. कृषी विभागातर्फे २० आणि २१ मार्चच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालात पाच हजार ७०२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्र आणि उत्पादकता व बाजारभाव याच्या आधारे कांद्याचे सर्वाधिक शंभर कोटींचे, तर त्याखालोखाल डाळिंबाचे २० कोटींचे, द्राक्षांचे १५ लाख १५ हजारांचे नुकसान झाले.

कांद्याचे सर्वाधिक १०० कोटींचे, तर डाळिंब-द्राक्षांचे ३६ कोटींचे नुकसान 

गारपिटीचा सलग दोन दिवस बसलेला तडाखा पाहता, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नुकसानीचे प्रमाण खूप मोठे असून, प्रत्यक्ष पंचनाम्यातून स्पष्ट होण्यास मदत होईल.जिल्ह्यात ७७ हजार ६०० हेक्टरवर लेट खरीप, तर एक लाख ६७ हजार हेक्टवर रब्बी तथा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातील चार हजार ९६६ हेक्टरला फटका बसला आहे. कांद्याचे हेक्टरी उत्पादन २० टन मिळत असून, सध्याच्या बाजारभावाचा विचार करता, नेमके नुकसान स्पष्ट होते. तसेच जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र ४० हजार हेक्टर आहे. त्यातील ११० हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी १८ टन उत्पादन मिळते आणि एक लाख रुपये टन भाव डाळिंबाचा आहे. जिल्ह्यातील द्राक्षांचे क्षेत्र ५८ हजार ३६७ हेक्टर असून, शेतकरी हेक्टरी २५ टनांपर्यंत उत्पादन घेतात. अवकाळी आणि गारपिटीचा २० हेक्टरला फटका बसला आहे. सद्यःस्थितीत सरासरी ३० रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री सुरू आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळीने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. त्यातून वाचलेल्या बागा काढणीची वेळ आलेली असताना छाटणीचे वेळापत्रक बिघडल्याने एकदम बाजारात द्राक्षे विक्रीसाठी आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे द्राक्षांचे देशांतर्गत, परदेशी बाजारपेठेतील भाव कोसळले आहेत. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

गहू, मका, हरभरा, भाजीपाल्यालाही फटका 
गहू, मका, बाजरी, हरभरा, भाजीपाला, वेलवर्गीय फळे, पपई याही पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे क्षेत्र ४३ हजार हेक्टर आहे. त्यातील ४४ हेक्टरचे नुकसान झाले असून, हेक्टरी २० टन उत्पादनावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. टनाला किमान २० हजार रुपये मिळतात. भाजीपाला उत्पादकांचे हे नुकसान पावणेदोन कोटींच्या पुढे पोचले आहे. शिवाय हेक्टरी दहा टन उत्पादन आणि २० हजार रुपये टन असा भाव मिळणाऱ्या वेलवर्गीय फळांचे पाच हेक्टरचे झालेले नुकसान दहा लाखांचे, तर हेक्टरी २५ टन उत्पादन व दहा हजार रुपये टन असा भाव मिळणाऱ्या पपईच्या चार हेक्टरचे नुकसान दहा लाखांच्यापुढे गेले आहे. गव्हाचे हेक्टरी २० क्विंटल उत्पादन शेतकरी घेतात. त्यास क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असून, १९६ हेक्टरच्या फटक्यातून शेतकऱ्यांना ७८ लाख ४० हजारांचे नुकसान सोसावे लागणार आहे. 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

१२ हेक्टरवरील बाजरीचे नुकसान

हेक्टरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणाऱ्या मक्याचे ११५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मक्याला क्विंटलला चौदाशे रुपयांपर्यंतचा भाव गृहीत धरल्यास शेतकऱ्यांना ४० लाख २५ हजारांचा भुर्दंड बसल्याचे दिसून येते. हरभऱ्याचे हेक्टरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असून, त्याचा किमान बाजारमूल्य दर क्विंटलला पाच हजार रुपयांच्यापुढे आहे. हरभऱ्याचे ४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, शेतकऱ्यांना ३३ लाख सात हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. बाजरी उत्पादकांचे नुकसान चार लाख रुपयांपर्यंतचे आहे. १२ हेक्टरवरील बाजरीचे नुकसान झाले आहे. बाजरीला क्विंटलला सोळाशेचा भाव मिळतो. 

जिल्ह्यातील भाजीपाल्याची स्थिती 
फळ-भाजीपाला क्षेत्र (हेक्टरमध्ये) उत्पादन (टनात) 
टोमॅटो १६ हजार ९९३ ५ लाख ६० हजार 
भेंडी ८१८ - 
इतर २७ हजार ९५३ -