अवकाळी, गारपीटने उत्तर महाराष्ट्रातील बळीराजा धास्तावला! अद्यापही अनेक शेतकरी मदतीविनाच

गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकांचं नुकसान झालं आहे. त्यापैकी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या अनेक जिल्ह्यांत प्रामुख्याने भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि केळीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्षभरापासून उत्तर महाराष्ट्रास नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. आता पुन्हा नाशिकमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली, यामुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. त्या धक्क्यातून शेतकरी सावरला नसताना मार्चच्या सुरुवातीला पुन्हा हे नवीन संकट कोसळले.. उत्तर महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील परिस्थितीचा आढावा घेता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्रचिती येईल....

वर्ष 2021 : कांद्याचे सर्वाधिक 100 कोटींचे, तर डाळिंब-द्राक्षांचे 36 कोटींचे नुकसान 

गारपिटीचा सलग दोन दिवस बसलेला तडाखा पाहता, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नुकसानीचे प्रमाण खूप मोठे असून, प्रत्यक्ष पंचनाम्यातून स्पष्ट होण्यास मदत होईल.जिल्ह्यात 77 हजार 600 हेक्टरवर लेट खरीप, तर एक लाख 67 हजार हेक्टवर रब्बी तथा उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. त्यातील चार हजार 966 हेक्टरला फटका बसला आहे. कांद्याचे हेक्टरी उत्पादन 20 टन मिळत असून, सध्याच्या बाजारभावाचा विचार करता, नेमके नुकसान स्पष्ट होते. तसेच जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र 40 हजार हेक्टर आहे. त्यातील 110 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हेक्टरी 18 टन उत्पादन मिळते आणि एक लाख रुपये टन भाव डाळिंबाचा आहे. जिल्ह्यातील द्राक्षांचे क्षेत्र 58 हजार 367 हेक्टर असून, शेतकरी हेक्टरी 25 टनांपर्यंत उत्पादन घेतात. अवकाळी आणि गारपिटीचा 20 हेक्टरला फटका बसला आहे. सद्यःस्थितीत सरासरी 30 रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री सुरू आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळीने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. त्यातून वाचलेल्या बागा काढणीची वेळ आलेली असताना छाटणीचे वेळापत्रक बिघडल्याने एकदम बाजारात द्राक्षे विक्रीसाठी आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे द्राक्षांचे देशांतर्गत, परदेशी बाजारपेठेतील भाव कोसळले आहेत. 

वर्ष 2020 - नांदगावात मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर परिसरासह तालुक्यातील काही भागात फेब्रुवारी महिन्यात गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. खळ्यात, मळ्यात उघडयावर असलेला कांदा भिजून खराब झाला होता.  यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार पावसा सहवादळ वारे व गारांचा पाऊस झाला, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांत दहशत निर्माण झाली होती. अचानक हवामानात बदल झाल्याने पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.  यानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

वर्ष 2019 : कमाल 36 हजारापर्यंत मदत; शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील निधी

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं होतं. नाशिक जिल्ह्यात  जोरदार पाऊस झाल्यानं द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर लाल कांद्याचे देखील नुकसान झाले असून यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अमरावती जिल्ह्यातही दहा दिवसांपासून होत असलेल्या अवेळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  यांनी दिले होते. 2 हेक्टर आणि 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान या निकषानुसार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी करण्याचे काम कृषी आणि महसूल यंत्रणेकडून सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांना मिळू शकणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 181 कोटी 50 लाख 84 हजार रुपयांचा निधीही पहिल्या टप्प्यात देण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही तहसीलदार स्तरावर ही मदत वितरित केली आहे. मात्र, 2 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आणि 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येते आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राच्या प्रमाणानुसार मदत दिली जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये ते कमाल 36 हजार रुपये मदत मिळू शकणार आहे.

वर्ष 2018 : 22 कोटी 34 लाख 32 हजार रुपये भरपाईपोटी 

2017 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 40 कोटी 58 लाखांची मदत पाठवली. 69 हजार 467 शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांत गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील 23 हजार 883 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 34 लाख 32 हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: 22 हजार 353 हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला होता. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला, तर जळगावात केळी आणि अन्य काही पिकांचे नुकसान झाले. प्राप्त निधी जिल्हा स्तरावरून डीबीटीअंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने 2016 मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 18 लाख रुपयांचा निधी पाठविला होता

वर्ष 2016 : वादळी वाऱ्यासह गारपीटीचा जोरदार तडाखा

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातील गावांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावासाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी  गारांचा खच साचून कांदा, डाळींब गहू, हरभरा आणि आंबा पिकांसह फळबागांचं नुकसान झालं होतं. धुळे आणि नंदुरबार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली आहे, धुळे जिल्ह्यातील साक्रीत वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला होता. जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर तालुक्यातील सुमारे 15 गावांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गरपीटीचा जोरदार तडाखा बसला. पारोळा तालुक्यातील कोळपींप्रि, अंबापींप्रि, बहादरपुर, कंकराज, भिलाली, इंद्रापींप्रि, सडावन, रडावन तसेच अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, फाफोरे या गावात गारपीट तर मंगरुळ, शिरुड गावात वादळाचा तडाखा बसला.

वर्ष 2015 : पुन्हा हजारो एकरवरील पिकांचे कोटय़वधींचे नुकसान; नुकसानभरपाची शेतकऱ्यांची तक्रार
नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडलेल्या नाशिकसह धुळे जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा हजारो एकरवरील पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी याआधीची नुकसानभरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसला. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १८८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कळवण, सटाणा व निफाड तालुक्यात पावसाने पिकांचे सर्वाधिक नुकसान केले आहे.