अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे बागलाणमध्ये दाणादाण; उन्हाळ कांद्याला ३०० कोटींचा फटका!

नामपूर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील दोन दिवसांत झालेली तुफान गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सुमारे ३०० कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरावर कोपलेल्या निसर्गामुळे उन्हाळ कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गारपिटीची सर्वाधिक झळ उन्हाळ कांदा पिकाला बसली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार बागलाण तालुक्यात चार हजार हेक्टरहून अधिक उन्हाळ कांद्याचे क्षेत्र बाधित असून, पाच हजार शेतकरी कुटुंबाचे अश्रू कोण पुसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना तातडीने रोख स्वरूपात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बळीराजा आर्थिक संकटात

अस्मानी संकटामुळे मोसम खोऱ्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले असून, कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न पडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने दाद कुणाकडे मागायची, अशी केविलवाणी अवस्था झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तीन ते चार वर्षांपासून परिसरातील शेतकरी गारपीट व अवकाळी पावसाशी झुंज देत आहे. यामुळे होणाऱ्या नुकसानीचे शासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याची तीव्र भावना नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब अहिरे यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

गारपिटीमुळे दुष्काळात तेरावा महिना

सध्या मोसम खोऱ्यात कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा काढल्यानंतर शेतातच वाळविण्यासाठी ठेवला होता. ऐनवेळी झालेली गारपीट व पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना आर्थिक दिलासा देण्याची नितांत गरज आहे. नामपूर, जायखेडा, खडकीपाडा, लखमापूर, तळवाडे दिगर, दसवेल, एकलहरे, टेंभे वरचे, द्याने, श्रीपुरवडे, खामलोण, राजपूर पांडे, चिराई, आसखेडा, फोफीर, गोराणे, महड, बहिराणे, बिलपुरी आदी गावांना फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेती व्यवसायावर दुष्काळाचे सावट आहे; परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. 

बागलाण तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी (२०/२१ मार्च) 

पीक बाधित क्षेत्र (हेक्टर) शेतकरी 
कांदा ४ हजार ०२० ४ हजार ८७८ 
भाजीपाला ४२ ३० 
गहू ७० १२५ 

एकूण बाधित क्षेत्र : ४ हजार १३२ हेक्टर 
एकूण बाधित शेतकरी : ५ हजार ०३३ 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

सत्ताधारी शासनाच्या कृषीविरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरशः पिचून गेला आहे. कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरीहितासाठी तातडीने आर्थिक मदत, वीजबिलमाफी, शेतमालाला हमीभाव देण्याची गरज आहे. 
-गायत्री कापडणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

बागलाण तालुक्यात दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे केले जातील. 
-एस. एस. पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण