अवकाळी पावसामुळे रानमेव्यावर संकट; ढगाळ वातावरणामुळे आंबा, जांभळासह करवंदांचे उत्पादन घटणार 

इगतपुरी (जि. नाशिक) : निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा, वातावरणातील असमतोलपणा व त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामळे झाडांचे बिघडलेले आरोग्य आणि महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावठी रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत.

लहरी वातावरणाचा फटका

सध्याच्या वाईट परिस्थितीमुळे व वेळोवेळी येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे आंबा, जांभूळ व करवंदांसह आवळ्याच्या मोहराला फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पन्नात घटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांसह फळाफुलांना लहरी वातावरणाचा फटका बसत आहे. येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले तर आहेच, शिवाय आता गावरान रानमेव्याबाबतही तेच घडत असल्यामुळे काही भागात आर्थिक संकट उद्‍भवणार आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा, करवंद व जांभळावर संक्रांत येणार आहे. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यातच कसारा घाटाच्या विस्तीर्ण जंगलामुळे या भागात शेंद्र्या, दौडी, साखऱ्या, पिठल्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळ्याची झाडे आहेत. दर वर्षी भरभरून उत्पन्न देणाऱ्या भागात मात्र नैसर्गिक असमतोलामुळे भरभरून आलेला मोहर या वातावरणाच्या कचाट्यात सापडून जळाल्यामुळे उत्पादनात घट होण्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

आदिवासी मुकणार कमाईला 

गावठी रानमेवा आणि आदिवासींचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात रानमेवा उपलब्ध होईल, तेवढ्या प्रमाणात आदिवासी व डोंगरदऱ्यांत वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळतो. उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्याच्या विक्रीतून प्रपंच भागवून येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी हेच दोन पैसे आवरून ठेवत नियोजन केले जाते. यंदा उत्पन्नच घटणार असल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे. 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

यंदा जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहर आणि बहर आला आहे. मात्र, ऐन फळवाढीच्या काळात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व उष्णतेचा तडाखा बसत असल्यामुळे बहर झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील, याची आतापासूनच शंका येत आहे. 
-अंजनाबाई खडके/फशाबाई तेलम, चिंचलेखैरे