अवैध वाळू उपसाप्रकरणी सिन्नर तहसीलदारांचा दणका! लाखोंच्या दंडवसुलीसाठी मालमत्तेवर टाच

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील वडांगळी येथील देवनदी पात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या अकरा जणांविरुद्ध महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारत दंड ठोठावला. हा दंड निर्धारित वेळेत न भरणाऱ्यांना सिन्नर तहसीलदारांनी दणका देत त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.

मंगळवारी (ता.१६) महसूल विभागाची पथके वडांगळीत कारवाईसाठी दाखल झाली. पण संभाव्य कारवाईच्या भीतीने संबंधित कुटुंबच घरादाराला कुलूप लावून परागंदा झाल्याचे आढळले. 

घरादाराला कुलूप लावून गायब

देव नदीपात्रातून अवैध उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिन्नरचे राहुल कोताडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ११ संशयितांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ट्रॅक्टर व इतर वाहने जप्त करण्यात आली होती. गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात कसूरदार असणाऱ्या अकरा जणांना तब्बल ३१ लाख दहा हजारांचा दंड जमा करण्याची नोटीस तहसीलदारांकडून बजावण्यात आली होती. यात तुळशीराम खुळे, दिलीप खुळे, दीपक खुळे, राहुल अढांगळे, भास्कर अढांगळे, विकास खुळे, सुभाष रणदिवे, प्रमोद अढांगळे, अविनाश अढांगळे, सुनील खुळे व संदीप अढांगळे यांचा समावेश होता. निर्धारित मुदतीत संबंधितांकडून दंडाच्या रकमेचा भरणा न करण्यात आल्याने त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तहसील कार्यालयाने सुरू केली होती. त्यानुसार सर्व संबंधितांना नोटिसा देऊन पूर्वसूचना देण्यात आली होती. या कारवाईसाठी मंगळवारी सकाळी अकराला तहसील कार्यालयातील दोन पथके मंडळ अधिकारी संजय गाडे व मंडळ अधिकारी दिनकर साबळे यांच्या नेतृत्वाखाली वडांगळीत दाखल झाली होती. कारवाईच्या भीतीने सर्व संशयित घरादाराला कुलूप लावून गावाबाहेर निघून गेले होते. मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

स्थगिती मिळवण्याची तयारी 

संबंधितांनी जंगम मालमत्ता जप्तीच्या कारवाईदरम्यान होणारी नामुष्की टाळण्यासाठी एकाच वेळी घरादाराला कुलूप लावून गाव सोडल्याची चर्चा आहे. हे सर्व जण न्यायालयाकडून स्थगिती मिळवण्याच्या प्रयत्नात असून, त्यामुळेच वसुली पथकाच्या हाती न लागण्याची खबरदारी देण्यात आली असावी. कारवाई करण्यात आलेल्यांच्या घरी एक व्यक्ती जरी मिळाली असती, तरी प्रशासनाने घरातील साहित्य, वाहनांवर टाच आणली असती. यापुढील टप्प्यात स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.   

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार