आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धां उत्साहात

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जिल्हा रुग्णालयातर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 18 ते 25 वयोगटाकरिता मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्यांना राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

संतोषी माता मंदिर, साक्री रोडपासून मॅरेथॉनला सुरवात झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग संतोषी माता मंदिर-फाशी पुल-प्रताप मील-स्टेशन रोड-दसेरा मैदान व परत संतोषी माता मंदिर असा 5 किलोमीटरचा होता. स्पर्धेचा समारोप संतोषी माता मंदिराजवळ झाला.

मॅरेथानच्या उद्धाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिरसाठ, विलास पाटील, सचिन शेवतकर, गौरी गाळणकर, नितीन पाटील, मिना भोसले, आशा माळी, जयश्री छाजेड, कल्पना शहा, सुनिता चांडक, सीमा बावीस्कर, निता इंगळे तसेच विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, एड्स आजाराबाबत नागरिक तसेच युवकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच एड्स आजाराबद्दलचे गैरसमज दूर व्हावे. यादृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जिल्हा रुग्णालयामार्फत 18 ते 25 वयोगटातील युवकांसाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संदेश देतांना म्हणाले की, आपला भारत देश हा युवकांचा देश असल्याने युवकांवर खुप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे युवकांनी देशहितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मॅरेथॉनमधील यशस्वी स्पर्धकांची नावे अनुक्रमे अशी :

पुरुष गटात प्रथम रोशन चंद्रकांत माळी, द्वितीय सागर देवेंद्र माळी, तृतीय शरद विजय अहिरे यांना तर महिला गटात प्रथम संतोषी शरद पिंपळसे, द्वितीय शेवंता तुळशीराम पावरा, तृतीय पुनम खंडु माळी अशा 3 पुरुष व 3 महिला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्यांना राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

प्रारंभी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबईचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस सुरवात केली. या स्पर्धेला युवक व युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

हेही वाचा :

The post आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धुळे येथे मॅरेथॉन स्पर्धां उत्साहात appeared first on पुढारी.