आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांसाठी दूतावासात अर्ज शक्य; आयडीपी अर्ज व्हिसाशिवाय

नाशिक : भारतीय नागरिक परदेशात असताना त्यांच्या वाहन चालविण्याच्या आंतरराष्ट्रीय परवान्याची (आयडीपी) मुदत संपल्यास नव्याने तो जारी करण्याबाबत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

परदेशातील पत्त्यावर हे परवाने कुरिअर

नागरिक परदेशात असतील आणि त्यांचा परवाना कालबाह्य झाला असेल, तर या नूतनीकरणासाठी कोणतीही तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नव्हती. आता नवीन सुधारणांनुसार भारतीय नागरिक त्यांच्या परवाना नूतनीकरणासाठी परदेशातील भारतीय दूतावास अथवा वाणिज्य दूतावासाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. असे अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे विचारात घेण्यासाठी ‘वाहन' (VAHAN) या भारतातील पोर्टलकडे पाठविले जातील. संबंधित आरटीओद्वारे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या परदेशातील पत्त्यावर हे परवाने कुरिअर सेवेद्वारे पाठविले जातील.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

आयडीपी अर्ज व्हिसाशिवाय

अधिसूचनेमुळे भारतातील आयडीपीसाठी विनंती करताना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध व्हिसाची अट वगळण्यात आली आहे. ज्या नागरिकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे, त्यांना अन्य वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच असे काही देश आहेत, जेथे व्हिसा ऑन अरायव्हल पद्धतीने अथवा प्रवासाच्या अखेरच्या क्षणी व्हिसा दिला जातो, अशा प्रकरणामध्ये प्रवासापूर्वी भारतात आयडीपीसाठी अर्ज करताना व्हिसा उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आता आयडीपी अर्ज व्हिसाशिवाय करता येऊ शकतो.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा