आईची नजर हटताच भामट्याने पळविली ‘चिमुरडी’; हॉस्पीटलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक :  रुग्णालयातील एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन गुपचूप जाताना आढळला. योगायोगाने एका दिवसा अगोदरच रुग्णालयाचे सीसीटीव्ही कार्यान्वित झाले. त्यात लागलीच तपासणी केली असता रुग्णालय प्रशासनालाही धक्का बसला. पोलीसांनी सूत्र फिरवली आणि नाकाबंदी लागू केली.  काय घडले नेमके?

हॉस्पीटलमधील धक्कादायक प्रकार
प्रतिभा भोला गौड (दीड वर्षे) असे अपहृत मुलीचे नाव आहे. अपहृत मुलीची मावशी मनीषा या गरोदर असून, मोरवाडी सिडको येथील रुग्णालयात तपासणीदरम्यान मनीषा हीची परिस्थिती किचकट असल्याने तेथून तिला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. त्यामुळे गरोदर मनीषा हिला घेऊन तिची बहीण संगीता गौड (ठाणे) या प्रतिभासोबत बहिणीला घेऊन शनिवारी आली. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलगी झोपल्याने आईने तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपविले. दुपारी दोनच्या सुमारास मुलगी दिसली नाही म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती आढळून आली नाही. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह
 
ठिकठिकाणी चौकशी ; चित्रण सीसीटीव्हीत कैद
योगायोगाने आजपासूनच सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहे. त्यात लागलीच तपासणी केली असता, रुग्णालयातील एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन जाताना आढळला. रुग्णालयाच्या सूत्रांनी तातडीने सरकारवाडा पोलिसांना माहिती दिली. लहान मुलगी अपहरणकर्त्याच्या ताब्यात असल्याने मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा भाग म्हणून काही काळ गोपनीयता पाळून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित ठिकठिकाणी चौकशी सुरू करीत नाकाबंदी केली. 

 पाच तासांने उपचार 
जिल्हा रुग्णालयातून दीड वर्षाच्या मुलीस पळवून नेल्याची घटना शनिवारी (ता. १३) उघडकीस आली. या प्रकाराचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. अपहृत बालिकेचे कुटुंब ठाण्यातील आहे. मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी चौफेर नाकाबंदी करीत चौकशी सुरू केली आहे. घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा मात्र ढिम्मच होती. गरोदर मनीषा यांच्यावर सायंकाळी सहापर्यंत उपचार झाले नाही. रुग्णालयात गेली असता, केसपेपरसह कागदपत्र सापडत नसल्याचे सांगून त्या गरोदर महिलेवर पाच तासांहून आधिक काळ उपचारही नसल्याने प्रवेशद्वारावर ती गरोदर महिला बसून होती. अखेर सायंकाळी सकाळ प्रतिनिधीने हा प्रकार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे जिल्हा रुग्णालयात आल्या. त्यांनी त्वरित संबंधित महिलेवर उपचाराच्या सूचना दिल्या. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत बसस्थानक, रेल्वेस्थानकावर पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र, तपास लागलेला नव्हता. 

हेही वाचा > रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

बहिणीला दाखल करण्याच्या धावपळीत एकाने मुलीला उचलून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला आहे. उपचारासाठी तिष्ठत असलेल्या गरोदर महिलेवर त्वरित उपचाराच्या सूचना दिल्या आहेत. 
-डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक 

 

 

तब्बल पाच तासांपूर्वी १२.५० मिनिटांनी केसपेपर काढला. मात्र, या धावपळीत नातेवाइकांची मुलगी चोरीला गेलीच. सोबत माझ्या पत्नीवर पाच तासांपासून उपचार नाही. सायंकाळी सव्वापाच वाजून गेले आता पुन्हा केसपेपर काढून आणा. तुमचे कागदपत्र सापडत नाही, असे म्हणून उपचारही करीत नाही. 
-इंदर गौड, गरोदर महिलेचा पती