आईमाऊलीचा उदो! सप्तशृंगगडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता; तीन दिवसांत लाखावर भाविक नतमस्तक

वणी (जि.नाशिक) : ‘जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम्, सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे’ व सप्तशृंगीमातेच्या जयघोषात गुरुवारी (ता. २८) दत्त अंबिका यागास पूर्णाहुती देऊन व आदिमायेस विश्वकल्याण व कोरोना महामारीचे संकट निवारणासाठी साकडे घालून शाकंभरी नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवारी (ता. २८) शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सुमारे २० हजार भाविकांनी, तर मागील तीन दिवसांत एक लाखावर भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. 

तीन दिवसांत लाखावर भाविकांकडून दर्शन 

गुरुवारी सकाळी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीच्या आभूषणांची आदिमायेच्या जयघोषात सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन प्रमुख प्रकाश पगार, विश्वनाथ बर्डे, पोपट ठाकरे, गोविंद तिवारी, सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख, मधुकर दुमसे व भाविक सहभागी झाले होते. आदिमायेस पिवळ्या रंगाची पैठणी नेसवून सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र, गुलाब हार, मणी-मंगळसूत्र, पुतळ्याचे गाठले, कंबरपट्टा, नथ, कर्णफुले, पावले, तोटे असा साजशृंगार केला होता. मंगळवार (ता. २६)पासून शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगीदेवी न्यास व पुरोहित संघातर्फे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दत्त अंबिका यागाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी स्थापित मंडल प्रांतपूजन, दत्त नामावली हवन, मूर्तीनाम षोडशोपचार पूजन, स्थापित देवतांम उतारांग यजन, विशेष हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक करूनसांज धूप दीप महाआरतीने दत्त अंबिका यागाची सांगता अर्थात शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

सप्तशृंगगडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता

न्यासाचे विश्वस्त भूषणराज तळेकर, विश्वस्त मनज्योत पाटील, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर विभागप्रमुख नारद अहिरे, सुनील कासार, पुरोहित संघाचे पुरोहित व भाविक उपस्थित होते. दत्त अंबिका याग मुख्य आचार्य श्रीकांत दीक्षित, उपआचार्य घनश्‍याम दीक्षित, प्रमोद दीक्षित, मिलिंद दीक्षित, गौरव देशमुख, शेखर देशमुख व २३ पुरोहितांनी पौरोहित्य केले. दरम्यान, गुरुवारी नवीन वर्षातील पहिली व शाकंभरी पौर्णिमा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.