‘आई’ सर्वात मोठी योध्दा..! कोरोना पॉझिटिव्ह मातेने अखेर दिला चिमुकल्या जीवाला जन्म 

सिडको (नाशिक) : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भवतीने एक करोना टेस्ट केली होती. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्व कुटुंब व गरोदर महिला हादरून गेले होते. पण म्हणतात ना...आई ही सर्वात मोठी योध्दा असते. तिने अखेर चिमुकल्या जीवाला या जगात आणलेच. नवा जन्म दिला काय घडले नेमके?

'आई' सर्वात मोठी योध्दा..! कोरोना पॉझिटिव्ह असतानाही दिला नवा जन्म

सिंहस्थनगर परिसरातील एका कुटुंबामध्ये एक महिला गरोदर होती. नववा महिना सुरू असताना अचानक ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक करोना टेस्ट केली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सर्व कुटुंब व गरोदर महिला हादरून गेले. त्याचवेळी त्या कुटुंबाने शिवसेना नगरसेविका किरण दराडे व समाजसेवक बाळा दराडे याच्याशी संपर्क साधला. तत्काळ दराडे दांपत्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना स्वतःच्या गाडीत बसवून रुग्णालयात घेऊन गेले. सिव्हिल सर्जन बरोबर संपर्क केला व ऍडमिट केले. रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने संकटमय परिस्थिती असल्याने सर्व गोंधळून गेले. रुग्णाला त्रास होत असताना योग्य नियोजन करून मनपा रुग्णालयाशी संपर्क साधून त्या महिलेची प्रसूती झाली. त्या मातेने अतिशय सुंदर गोंडस बाळास जन्म दिला, आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

दराडे दांपत्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त

शिवसेना नगरसेविका किरण दराडे व सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे या दांपत्याच्या मदतीने गर्भवती पॉझिटिव्ह मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची सुखद घटना घडली. कोरोना संकटकालीन परिस्थितीमध्ये वेळीच मदतीला धावून जाणाऱ्या या दराडे दांपत्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

पती-पत्नी जिवावर उदार होत गेल्या वर्ष दीड वर्षापासून केवळ प्रभागातील नव्हे तर सिडकोतील कानाकोपऱ्यातील नागरिक व कोरोना पॉझिटिव रुग्णांसाठी धावपळ करत आहोत. यामध्ये आम्ही देखील पॉझिटिव झालो होतो. नागरिक व रुग्णासाठी काहीतरी चांगले करतोय, याचे मनापासून समाधान वाटते - किरण गामणे-दराडे, नगरसेविका, प्रभाग २७. 
 

 

नगरसेविका किरण दराडे व सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे अशा बिकट परिस्थितीत धावून आले नसते तर आमची फार वाईट अवस्था झाली असती. जिवाची पर्वा न करता दराडे दाम्पत्याने वेळीच व्यवस्थित रुग्णालयापर्यंत पोहोचविले. आम्हाला त्यांच्यात खऱ्या अर्थाने देव बघितल्याची जाणीव झाली. 
- प्रमोद सातपुते, गर्भवती महिलेचा भाऊ