आक्षेपार्ह पत्रके वाटून समाजामध्ये तेढ निर्माण करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दोन समाजांंत तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले पत्रक छापून पंचवटी परिसरातील राजवाडा भागातील घरांमध्ये वाटप करणाऱ्या संशयित अमोल चंद्रकांत सोनवणे (३७, रा. पंचवटी) याला न्यायालयाने गुरुवार (दि. २७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आक्षेपार्ह पत्रक संशयिताने स्वत: लिहिले असून, त्यानेच ते छापल्याचे समोर येत आहे.

पंचवटी परिसरात शनिवारी (दि. २२) सकाळी आक्षेपार्ह मजकूर छापलेली पत्रके वाटल्याचे उघड झाले. हे पत्रक सोशल मीडियावरही व्हायरल झाले. त्यामुळे संतप्त जमावाने रास्ता रोको करून निदर्शने केली.

शेकडोच्या जमावाने रास्ता रोको आंदोलनासह दुकाने बंद केल्यामुळे दुपारपर्यंत परिसरात तणाव होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करीत संशयित अमोल सोनवणे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध दंगल घडविण्याचा प्रयत्न, एखाद्या धर्माचा किंवा समाजाचा अवमान करणे, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलिस तपासात संशयित अमोलने ज्या मुलाच्या नावे ही आक्षेपार्ह पत्रके छापली होती, त्याच्या कुटुंबातील महिला नातलगाशी बोलण्याच्या कारणातून अमोलचा वाद झाला होता. या रागातून संबंधित तरुणाला त्रास देण्याच्या उद्देशाने अमोलने हा प्रकार केल्याचे उघड झाले. मात्र, अमोलच्या या प्रकारामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होऊन शहरात तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. या घटनेचा निषेध नोंदवून आंदोलक, विविध संघटनांनी संशयितावर कठोर कारवाईची तसेच या घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधण्याचीही मागणी केली.

पत्रक स्वत:च छापले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अमोल सोनवणेविरोधात याआधीही पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. आर्थिक अपहाराच्या तक्रारीमध्येही त्याचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे, तर सोनवणेने स्वत: संबंधित पत्रकावरील मजकूर लिहिला. त्याने स्वत:च ते पत्रक एका प्रिंटरवरून छापून त्याच्या प्रती वाटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे केवळ समोरील व्यक्तीवरील खुन्नस व वचपा काढण्याच्या नादातून त्याने दोन समाजांत तेढ निर्माण केल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा: