आगामी निवडणुकीबाबत महायुती बैठकीत आ. कोकाटेंचा गर्भित इशारा; भुजबळांची दांडी

भुजबळ, कोकाटे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेतील धक्कादायक पराभवानंतर महायुती घटक पक्षांमध्ये ब्लेमगेम सुरू असतानाच, येथील बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भर बैठकीतील वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेच्या मनात प्रचंड संभ्रम असल्याने तो दूर करणे आ‌वश्यक आहे. अन्यथा आगामी विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याहून अधिक वाईट स्थिती असू शकेल, असा गर्भित इशारा महायुती बैठकीमध्ये आ. कोकाटे यांनी देत राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीवर लक्ष वेधले. या महायुती बैठकीबाबत राष्ट्रवादीकडून नव्हे, तर पालकमंत्री भुसेंकडून आपणास अवगत करण्यात आल्याचे सांगत आ. कोकाटे यांनी स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय नसण्यावर बोट ठेवले. दुसरीकडे महायुती बैठकीला राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित राहिल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधान परिषद नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये महायुती घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे, तर दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने ॲड. महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीस आ. देवयानी फरांदे, आ. सरोज अहिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, माजी खा. हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

कोण हे भावसार?

महायुती बैठकीनंतर आमदार कोकाटेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ॲड. महेंद्र भावसार यांना अजित पवार गटाने एबी फॉर्म दिला आहे, असे विचारल्यावर, कोण हे भावसार अशी प्रतिपृच्छा करीत आमच्या पक्षाचा उमेदवार असेल, तर आम्ही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार अथवा त्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जर आमच्या पक्षाने माघार घेतली नसेल आणि आम्हाला अजितदादांनी आदेश दिला, तर त्याच अनुषंगाने काम करणार असल्याचे जाहीर केले.

भुजबळांची नाराजी?

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीची बैठक झाली. बैठकीला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे एकूणच गेल्या चार-पाच दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. यासंदर्भात भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या वड्याचे तेल वांग्यावर असे सुरू असल्याची टिप्पणी त्यांनी केली. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नाही. संबंधित बैठक शिंदे गटाच्या उमेदवारासाठी होती. आम्ही या निवडणुकीत ॲड. भावसार यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार, आम्ही त्याच्यांसमवेत राहू अशी प्रतिक्रिया भुजबळ दिली.

हेही वाचा: