आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा 

नाशिक : पुढील वर्षभरातील नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केला. ‘एकला चलो’चा नारा देण्यात आला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अशोक सावंत, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, युवक शहराध्यक्षा अंबादास खैरे, मनोहर कोरडे, मुख्तार शेख, डॉ. अमोल वाजे, धनंजय निकाळे, नाना पवार, बाळासाहेब पाटील, सुरेखा निमसे, किशोरी खैरनार आदी उपस्थित होते. 

नाशिककरांची निराशा 

महापालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवून देखील शहरवासीयांच्या पदरी निराशा पडली आहे. अशा परिस्थितीत नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आवाज उठवून नाशिककरांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा विश्वास या वेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

शरद पवारांचा वाढदिवस व्हर्च्युअल 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात व्हर्च्युअल स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

मराठा आरक्षणप्रश्‍नी राजकीय षडयंत्र 

मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना नाशिकमध्ये काही कार्यकर्त्यांनी श्री. पवार यांच्या निवास्थानी मोर्चचा इशारा दिला. आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना श्री. पवार यांना त्यात गोवणे हे राजकीय षडयंत्र आहे, अशी टीका नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, आमदार जयवंतराव जाधव, अशोक सावंत, किशोर शिरसाठ, निवृत्ती अरिंगळे यांनी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे न्यायलयात पाठपुरावा सुरू असताना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याच्या षडयंत्राला भाजपचा छुपा पाठिंबा असून, भाजपमधूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी फूस लावत असल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली