आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार नाशिकमधून, कुणा विरोधात? पाहा

आचार संहिता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे. या कक्षात सोमवारी (दि.१८) पहिली तक्रार दाखल झाली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उद‌्घाटन केलेल्या रस्त्याच्या बाजूचा ग्रीन फलक झाकला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी असे लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघात पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचा कक्षदेखील कार्यन्वित केला आहे. या कक्षात २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात येत आहे.

लोकसभेवेळी मतदारांना दाखविण्यात येणारे आमिष तसेच आचरसंहितेशी निगडीत तक्रारी नागरिकांनी या कक्षात करता येतील. त्यानुसार हा कक्ष कार्यन्वित झाल्यानंतर पहिलीच तक्रार दाखल झाली आहे. तक्रारकर्त्या नागरिकाने राष्ट्रीय महामार्गावर खा. गाेडसे यांच्या हस्ते उद‌्घाटन केलेला फलक झाकला नसल्याची तक्रार केली आहे. सदरचा फलक तातडीने झाकण्यात यावा, अशी सूचनाही संबंधिताने केली आहे.

१९५० टोल-फ्री क्रमांक

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यान्वित आचारसंहिता कक्षासाठी १९५० हा टोल-फ्री क्रमांक असेल. आचारसंहिता भंगबाबत नागरिकांना या क्रमाकांवर तक्रारी नोंदविता येतील. दरम्यान, प्रशासनाकडून सदर कक्षाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

The post आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार नाशिकमधून, कुणा विरोधात? पाहा appeared first on पुढारी.