आजपासून दुकाने  दहा ते पाच या वेळेत सुरू; संपूर्ण लॉकडाउनची पूर्वतयारी 

नाशिक : संपूर्ण लॉकडाउनच्या पूर्वतयारीसाठी सोमवार (ता. १२)पासून राज्यातील दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू होतील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

संतोष मंडलेचा : संपूर्ण लॉकडाउनची पूर्वतयारी, प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा 
राज्यात संपूर्ण लॉकडाउनचे सूतोवाच राज्य सरकारने केले असले, तरी अद्याप त्याचा अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण लॉकडाउनची शक्यता असल्याने, तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी व्यापार सुरू करतील, असे सांगून श्री. मंडलेचा आणि श्री. गांधी म्हणाले, की राज्य सरकारचा निर्णय आज सायंकाळपर्यंत होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे राज्यातील व्यापारी सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. परंतु सरकारने आज कोणताही निर्णय जाहीर केला नाही. 
वर्षाखेरनंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता तसेच, अन्य बाबींची तयारी लॉकडाउनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील व्यापारी दहा ते पाच या मर्यादित वेळेत कोरोना संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचे कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार आहेत.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

राज्यात आजपासून दुकाने दहा ते पाच या वेळेत सुरू

सर्व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. राज्यातील व्यापाऱ्यांनी कोरोनासंबंधीच्या निकषांचे कठोरपणे पालन करावे. मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझेशन या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे. दुकानदारांनी स्वतः व आपल्या कामगारांच्या तपासण्या करून घ्याव्यात. लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ