आजीने नातीला वाचविले मृत्यूच्या दाढेतून! ‘ती’ पायवाट बेतली जीवावर; थरारक प्रसंग

काळुस्ते (जि.नाशिक) :  सहा वर्षाची मुलगी किरण ही नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून पायवाटेने घरी जात होती. बरोबर तिची आजी व बहीण होती. त्याच दरम्यान असा काही थरारक प्रसंग घडला. ज्याला तिघींनी तोंड दिले. आणि अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून ओढून आणले 

'ती' पायवाट बेतली जीवावर; थरारक प्रसंग

मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खेडभैरव येथील देवाचीवाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची सहा वर्षाची मुलगी किरण ही नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून पायवाटेने घरी जात होती. बरोबर तिची आजी व बहीण होती. त्याच दरम्यान जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून किरणवर हल्ला चढविला. प्रारंभी तिची आजी घाबरली. तिने जोराचा आरडाओरड केली. मात्र तिने धाडस करून बिबट्यावर प्रतिकार केला व बिबट्याच्या तावडीतून नातीला सोडविले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ वन विभागास माहिती दिली.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

आजीने प्रतिकार करताच बिबट्याने ठोकली धूम 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. बुधवारी (ता. ३) वन विभाग अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल ढोन्नर, रेश्मा पाठक, पाडवी, सय्यद, मुनिफ शेख आदींनी परिसरात गस्त घालून बिबट्याचा मागोवा घेतला. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी आज घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, वन विभागाचे फिरते पथकप्रमुख पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी येऊन बिबट्यास जेरबंद करण्यासाठी सूचना दिल्या. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

बालिकेवर प्राथमिक उपचार सुरू

इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव देवाचीवाडी शिवारात मंगळवारी (ता. २) सायंकाळी दुकानातून आजीबरोबर पायवाटेने घरी जाणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला. आजीने जोरदार प्रतिकार केल्याने आजीने बिबट्याच्या तावडीतून नातीला वाचवले. दरम्यान, जखमी झालेल्या बालिकेवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.