आजीबाईंची कमाल! वय वर्षे 104; कोरोनाला लावले हुसकावून,पाहा VIDEO

नाशिक : सध्या कोरोना रुग्‍णांची संख्या पुन्‍हा वाढू लागल्‍यानं पुन्‍हा एकदा भितीदायक वातावरण निर्माण होऊ लागलंय. पण इच्‍छिाशक्‍ती असेल, अन्‌ योग्‍य उपचार मिळाला तरी घरी राहून कोरोनावर मात करता येऊ शकते हे १०४ वर्षांच्‍या सीताबाई दत्तात्रय सानप आजींसह संपूर्ण कुटुंबाने सहउदाहरण सिद्ध केलंय. येथील डॉ.अतुल वडगावकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली गृहविलगीकरणात राहात कुटुंबातील एकूण सात सदस्‍यांनी कोरोनाचा पराभव केलाय.

रुग्‍णालयात दाखल न होता गृहविलगीकरणात घेतले उपचार

साधरणतः ३ फेब्रुवारीच्‍या सुमारास सानप कुटुंबात कोरोनाने धडक घेतली. तेथून कोरोनाचा फैलाव होताना तब्‍बल सात सदस्‍यांना कोरोनाचे निदान झाले. यात कुटुंबातील सर्वात ज्‍येष्ठ १०४ वर्षीय सीताबाई दत्तात्रय सानप यांचाही समावेश होता. कुटुंबावर कोरोनामुळे दडपण आलेले असतांना, वेळीच डॉ.अतुल वडगावकर यांच्‍याकडे उपचाराला सुरवात केली. अन्‌ काही दिवसांतच संपूर्ण कुटुंबाने गृहविलगीकरणात राहाताना कोरोनावर मात केली.

आजींसह त्‍यांची कन्या मीराबाई बोडे (वय ६०), व सानप कुटुंबातील शकुंतला सानप (वय ५०), रेखा सानप (वय ३९), योगेश सानप (वय २५), अविनाश सानप (वय ४५) आणि ओम सानप (वय १६) यांनी कोरोनाचा पराभव केलाय.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सानप कुटुंबातील सदस्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याने प्रथम दडपण आले होते. त्‍यात आईचे वय १०४ वर्ष असल्‍याने काय करावे हा प्रश्‍न होता. त्‍यातच डॉ.अतुल वडगावकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घरी राहूनच उपचार घेत सर्व सदस्‍यांनी कोरोनावर मात केली.- दामोदर सानप, आजींचे चिरंजीव.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

माझ्यासह अन्‍य कुटुंबातील सदस्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याने सुरवातीला थोडी भिती वाटली. परंतु डॉक्‍टरांनी धीर देताना योग्‍य उपचार केले. घरी राहून ऑक्‍सीसनचा स्‍तर व अन्‍य वैद्यकीय निरीक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्‍यानुसार डॉक्‍टरांच्‍या सल्‍याने उपचार घेत कोरोनावर मात केली.- योगेश सानप, नातेवाईक.

 

आजींवर उपचार करतांना वयाचे आव्‍हान होते. सांगतलेल्‍या बाबींचे काटेकोरपणे पालन करणार असल्‍याची ग्‍वाही सानप कुटुंबियांनी दिल्‍यानंतर उपचार सुरू केले. गृहविलगीकरणात राहून आजींसह सर्वांनी कोरोनावर मात केली. कालच केलेल्‍या चाचणीत त्‍यांच्‍यात अँन्‍टीबॉडीज्‌ तयार झाल्‍याचा अहवाल प्राप्त झालाय.-डॉ.अतुल वडगावकर

 

ओपन क्‍लिनीक संकल्‍पना पुन्‍हा ठरतेय प्रभावी

दरम्‍यान २०२० मध्ये शासकीय व खासगी रुग्‍णालयांवर कोरोना बाधितांवर उपचाराचा व्‍याप वाढत असतांना डॉ.वडगावकर यांनी ओपन क्‍लिनीक ही संकल्‍पना राबविली. याअंतर्गत खुल्‍या जागेत रुग्‍णांवर उपचार करताना गृहविलगीकरणात राहूनच घरगुती वातावरणात औषधोपचाराद्वारे सुमारे साडे तीन हजार रुग्‍णांना बरे केले आहे. सोबत शासकीय यंत्रणेवर रुग्‍णांच्‍या उपचाराचा येणारा ताण कमी केला होता. गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, आता पुन्‍हा एकदा ओपन क्‍लिनीकचे महत्त्व अधोरेखीत होते आहे. वेळीच निदान, योग्‍य उपचार अन्‌ खबरदारी सध्याच्‍या काळात महत्त्वाचे असल्‍याचे डॉ. वडगावकर यांचे म्‍हणणे आहे.