आठवडे बाजारात भाज्या मातीमोल; बटाट्याचे दर मात्र अद्याप चढेच

पंचवटी (नाशिक) : बुधवारच्या आठवडे बाजारात सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर कोसळल्याचे दिसून आले. गत आठवड्यापर्यंत उसळी घेणा-या टोमॅटोंसह सर्व प्रकारच्या पालेभाज्या मातीमोल भावात विकण्याची आफत विक्रेत्यांवर कोसळली. नाही म्हणायला बटाट्यांनी उसळी घेतली असून ते पन्नास रूपये किलोदराने तर कांदे तीस ते चाळीस रूपये किलो दराने उपलब्ध होते. 

ऑक्टोबर महिन्यातील अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यासह टोमॅटो व अन्य पालेभाज्यांच्या भावाने मोठी उसळी घेतली होती. त्यानंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर आलीतरी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांद्याला सोन्याचा मूल्य प्राप्त झाले होते. त्यामुळे काहीकाळ हॉटेलसह घरगुती जेवणातून कांदा हद्दपार झाला होता. आता आठवडे बाजारात मध्यम प्रतीचा कांदा शंभर रूपयांत तीन किलो यादराने उपलब्ध होता. बटाट्याचे दर मात्र खाली येण्याचे चिन्हे नाहीत, चांगल्या दर्जाच्या किलोभर बटाट्यासाठी पन्नास रूपये मोजावे लागत होते. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

अवघ्या पाच रूपयांत कोथिंबीर, मेथी 

थंडीमुळे मेथी व कोथंबीरीचे पीक मोठ्या प्रमाणावर आले आहे. त्यामुळे बाजारात समितीत मेथी व कोथंबिरीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी आठवडे बाजारात मेथी, कोंथिबीरीची जुडी अवघ्या पाच रूपयांत उपलब्ध होती. याशिवाय पालक व अन्य पालेभाज्याही केवळ पाच रूपयांत उपलब्ध होत होत्या. यासंधीचा लाभ घेत अनेकांनी एकाएवजी दोन जुड्यांची खऱेदी केली. याशिवाय कोबी, फ्लॉवरचे कंदही अवघ्या पाच रूपयांत उपलब्ध होते. गिलले, कारली, भोपळा या वेलवर्गीय भाज्यांनाही मागणी नसल्याने त्यांचेही भाव कोसळले होते. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

बाजार समितीत भाव नसल्याने मेथी व कोथिंबीर घेऊन आठवडे बाजार गाठला, जेणेकरून दोन पैसे गाठीशी येतील, परंतु कमी भावामुळे तेथेही निराशाच झाली. 
- शांताराम माळोदे, शेतकरी, आडगाव