आठ दिवसांत अवैध धंदे बंद करा : दादा भुसेंचा अल्टिमेटम

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्जमुळे नाशिकच्या नावाला गालबोट लागले आहे. त्यामुळे अवैध धंदे व गैरप्रकारांविरोधात रस्त्यावर उतरून कारवाई करावी. त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देत आहे. या कालावधीत बदल न झाल्यास संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस व संबंधित विभागांना दिला. कारवाईत काेणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने हस्तक्षेप केल्यास त्याचीही चौकशी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. १७) पालकमंत्र्यांनी अमली पदार्थविरोधी जनजागरण चळवळीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिकचे नाव पुढे येणे ही गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. तसेच अवैध धंद्यांबाबत लोकप्रतिनिधींच्या संतप्त भावना आहेत. त्यामुळे पोलिस विभागासह संबंधित विभागांनी अ ॅक्शन मोडवर येण्याची गरज असल्याचे भुसे म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणामध्ये यापूर्वी सहभागी असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करताना आठ दिवसांमध्ये या बद्दलचे पाळेमुळे खणून काढावी. या प्रकरणात जे पाठीराखे असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश भुसे यांनी पोलिसांना दिले. ड्रग्ज प्रकरणात अगदी ‘मी फोन केले असतील, कुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला असेल तर माझीही चौकशी करावी’. मात्र, या प्रकरणी कुणालाही सोडू नका, असेही पोलिसांना सांगितल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. शाळा-महाविद्यालये सुटण्याच्याप्रसंगी पोलिसिंग करण्यात यावे. त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल व लॉजिंगची तपासणी करताना या भागातील नायजेरियन विद्यार्थ्यांच्या वाढत्या त्रासाबद्दल उपाययोजना करावी, अशा सूचना भुसे यांनी पोलिसांना केल्या.

अवैध धंद्यांविरोधात हेल्पलाइन क्रमांक

अवैध धंदे, गैरप्रकारांबाबत माहिती व तक्रारीसाठी ‘हेल्पलाइन खबर’ नावाने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाइन खबरच्या ६२६२२५६३६३ या क्रमांकावर तसेच ८२६३९९८०६२ या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करता येईल. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

सगळ्यांची पार्श्वभूमीची माहिती

नाशिकमधील ड्रग्जप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याबद्दल भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. या प्रकरणी कोणी राजकारण करू नये, असे आवाहन करताना सर्वांची पार्श्वभूमी आपल्याकडे आहे. कोण कुठे दुखावले गेले हेही आपण जाणून असल्याचा टोला भुसे यांनी ठाकरे गटाला लगावला.

हेही वाचा :

The post आठ दिवसांत अवैध धंदे बंद करा : दादा भुसेंचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.