आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

म्हसरूळ (जि.नाशिक) : आडगाव शिवारातील स्टील व्यापाऱ्याला नगर जिल्ह्यातील विक्रेत्याने तब्बल साडेपाच लाखांच्या ११० क्विंटल लोखंडी मालाचा गैरव्यवहार करीत गंडा घातला. काय घडले नेमके वाचा...

११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

आडगाव ट्रक टर्मिनस परिसरातील विजय स्टीलचे मालक ऋषभ विनोद बन्सल (रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित साई ट्रेडर्सचे मालक नीलेश उत्तम गवळी (रा. देवठाण, ता. अकोले, जि. नगर) यांनी विश्वास संपादन करून नेहमीप्रमाणे मालाची मागणी केली. त्यानुसार ५३ हजारांचे ८५५ किलो प्लेटेड शिट्स, एक लाख ११ हजारांचे तीन हजार ३० किलो लोखंडी अँगल आणि तीन लाख नऊ हजारांचे सात हजार ८५ किलोचे पाइप असे जीएसटीसह पाच लाख ६० हजारांचे लोखंडी साहित्य संशयित भगवान साळुंके (रा. ओझर, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या वाहनात रवाना केले. मात्र आठ दिवसांनंतर बन्सल यांनी संबंधित मालाच्या बिलाची मागणी केली असता संशयित नीलेश गवळी यांनी मालच मिळाला नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

तर वाहनमालक भगवान साळुंके यांनी मात्र गवळी यांना माल दिल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बन्सल यांनी गवळी व साळुंके यांच्याविरोधात आडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ