आडगाव, ओढा भविष्यातील विकासाचे नवे केंद्र! सुरत-चेन्नई महामार्ग ठरणार वरदान 

नाशिक : नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्स्प्रेस महामार्ग नाशिक शहरातून आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव शिवारातून पुढे निफाड सिन्नरकडे जाणार असल्याने भविष्यात आडगाव व ओढा हा भाग बिझनेस सेंटर म्हणून नव्याने विकसित होणार आहे. आडगाव परिसरातून ओझर विमानतळ तसेच, मुंबईकडे जाण्यासाठी उड्डाणपूल तयार असल्याने जागांना अधिक भाव येणार आहे. 

जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून ग्रीन कॉरिडॉर महामार्ग

केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाच्या वतीने भारतमाला प्रकल्पांतर्गत सुरत ते चेन्नई ग्रीनकॉरिडॉर एक्स्प्रेस वे उभारला जाणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या माध्यमातून सुरत- नाशिक- सोलापूर- हैदराबादमार्गे थेट चेन्नईला पोचता येणार आहे. उत्तर महाराष्ट्र थेट दक्षिण भारताला जोडला जाणार असून, नाशिकहून अवघ्या दहा तासांत रस्तेमार्गाने चेन्नईला पोचता येणार आहे. या माध्यमातून वेळ व इंधनाची बचत होईल. समृद्धी महामार्गाला ग्रीन कॉरिडॉर कनेक्ट केला जाणार आहे. प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून ग्रीन कॉरिडॉर महामार्ग जाणार आहे. यात सुरगाणा तालुक्यातील बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, राक्षसभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ. पेठ तालुक्यातील पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव. दिंडोरी तालुक्यातील तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बु., जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, रासेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबे दिंडोरी, ढकांबे, शिवनई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहुर. नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव. निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द., चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, वाडे, पिंपळगाव निपाणी, तर सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावांतून १२२ किलोमीटरचा मार्ग असेल. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

दर तीस किलोमीटरला बिझनेस सेंटर 

नाशिक शहरातून मुंबई-आग्रा महामार्ग जातो. महामार्गावरील आडगाव येथे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर नाशिकला जोडला जाणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉर वर दर तीस किलोमीटरला बिझनेस सेंटर उभारले जाणार आहे. आडगाव येथे बिझनेस सेंटरचे नियोजन असल्याने या भागाचे महत्त्व वाढणार आहे. दिंडोरी, निफाड या बागायती तालुक्यांतील कृषी मालाची आयात या भागातून होणार आहे. तसेच, ओझर विमानतळावर जाण्यास सोयीचे असल्याने या भागाचे भविष्यात महत्त्व वाढणार आहे. ओढा येथे नाशिक रेल्वे स्थानकाचा विचार सुरू असल्याने व महामार्ग या भागातून जाणार असल्याने या भागाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व अधिक वाढणार आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच