आडगाव नाक्यावरील संभाजीनगर नामफलक गायब; शहरात मनसे विरुद्ध भाजप वादाला खतपाणी 

नाशिक : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे एकत्रीकरण होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच संभाजीनगर मार्ग नामफलकावरून मंगळवारी (ता. १२) सत्ताधारी भाजप व मनसेत खटके उडाले. औरंगाबाद महामार्गावर मनसेने लावलेला संभाजीनगर नामफलक महापालिकेच्या पथकाने हटविला, तर मनसेने फलकच चोरीला गेल्याची तक्रार पंचवटी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

कॉंग्रेसचा नामांतराला विरोध

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने नामांतरणाचे जोरदार समर्थन केले आहे. मात्र, कॉंग्रेसने संभाजीनगर नामांतराला विरोध केला आहे. संभाजीनगर नामांतरणाचे राज्यात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये मनसेने औरंगाबाद महामार्गावरील आडगाव नाका येथे छत्रपती संभाजीनगर असा नामफलक शनिवारी (ता. ९) लावत समर्थनार्थ उडी घेतली होती. मंगळवारी संभाजीनगर नामफलक जागेवरून गायब झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नगरसेवक सलीम शेख, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, श्‍याम गोहाड, सुजाता डेरे आदींनी केली. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
 

महापौरांना मनसे विचारणार जाब 

मनसेने नामफलक चोरीला गेल्याची तक्रार दिली असली, तरी महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या अतिक्रमण पथकाने फलक हटविल्याचे समोर आले. विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी पोलिस निरीक्षकांना पत्र दिल्याने फलक हटविल्याचे सांगितले. दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने कारवाईला विरोध करणे गरजेचे होते, असा दावा करून याबाबत महापौर व आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितले.   

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा