आता अडीच वर्षाच्या बालकालाही मिळणार नर्सरीत प्रवेश; शिक्षण विभागाचा निर्णय

नाशिक : पाल्याच्या मेंदूची जडणघडण, त्याचा वाढीचा काळ अन्‌ लेखन- वाचन कौशल्य आदींचा सारासार विचार करून शिक्षण विभागाने बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आणला. त्यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश वय वर्ष सहा पूर्ण झाले पाहिजे, असे नमूद केले. परिणामी नर्सरी प्रवेशासाठी वय तीन वर्षाचे झाले. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा ‘अरे माझ्या मागल्या’ चा पाढा वाचत नर्सरीसाठी अडीच व पहिलीसाठी साडेपाच वर्ष वय असले तरी चालेल, असे परिपत्रक काढीत आपल्या सुज्ञ कारभाराची प्रचिती राज्याच्या शिक्षण विभागाने दिली आहे. 

२५ जानेवारी २०१७ ची अंमलबजावणी राज्यभर सुरू 

काही वर्षांपूर्वी अडीच वर्षाच्या मुलांना नर्सरीमध्ये किंवा छोट्या गटात प्रवेश दिला जायचा. याचा अर्थ इयत्ता पहिली चे प्रवेश वय हे पाच वर्ष सहा महिने होते. त्यानंतर मुलांच्या मेंदूच्या जडणघडण, त्यांची बाल्यवस्था व अन्य बाबी लक्षात घेत राज्यस्तरावर समिती नियुक्ती करण्यात आली. शासनाने बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. शासन निर्णय २५ जानेवारी २०१७ ची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली. यामध्ये ३० सप्टेंबर हा मानवी दिनांक प्रवेशासाठी गृहीत धरावा, असे सांगितले. त्यानुसार नर्सरीमध्ये प्रवेश घ्यायचे वय तीन वर्ष तर इयत्ता पहिलीला सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ लागला. 

दोन वर्षातच पुन्हा बदलला निर्णय 

दोन वर्ष शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर अचानक ज्युनिअर के. जी किंवा सिनियर के. जी किंवा मोठा गट मधील विद्यार्थी होते, त्यांच्यासाठी या नियमातून सूट मिळावी म्हणून शिक्षण विभागाने (क्रमांक : आर.टी. ई/२०२०२-२१/टे-५२०/३३४६) शासन निर्णय काढला. यात या वर्षाच्या बॅचला हा वयाचा नियम लागू होणार नाही, तसेच इयत्ता पहिलीला सहा वर्ष पूर्ण हवे पण नर्सरी ला प्रवेश किंवा छोट्या गटात प्रवेशाला मानवी दिनांक ३१ डिसेंबरची तारीख धरावी, असे नमूद केले. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

बाल्यवस्थेतेील मेंदूच्या जडण-घडणीचे काय?

याचाच अर्थ नर्सरीला प्रवेश वय वर्ष अडीच पूर्ण झालेले घेतील आणि हे नर्सरी चे विद्यार्थी तीन वर्षांनी पूर्वप्राथमिक पूर्ण करतील आणि इयत्ता पहिला प्रवेश घेतील तेव्हा त्यांचे वय साडेपाच वर्षाचे असतील म्हणजे सहा वर्ष पूर्ण नसेल. शासनाला पुन्हा जर मागीलच निर्णय कायम ठेवायचा होता तर मग समिती व बालहक्क गेला कुठे, बाल्यवस्थेतेील मेंदूच्या जडण-घडणीचे काय, ह्या केवळ गप्पा होत्यात का, असा प्रश्‍न या निर्णयामुळे निर्माण झाला आहे.

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना