Site icon

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणुकीवरुन राजकारण तापले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव शहराच्या विकासाचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले होते. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका, असे महाजन म्हणाले होते, ही आठवण करून देत खडसेंनी महाजनांवर शाब्दिक हल्ला चढवला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे, असे खडसे म्हणाले.

दोघा मंत्र्यांकडून पलटवार

एकनाथ खडसेंच्या आरोपावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. त्यांना आता भरपूर वेळ आहे, म्हणून ते रोज बोलत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचे काम त्यांनी करत राहावे. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल, असे महाजन यांनी म्हटले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही खडसेंवर निशाणा साधला आहे. आधीच्या सरकारने ४२ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. ती आम्ही उठवली आहे. एएनओसी मिळत नसल्याने रस्त्यांची कामे थांबली होती. मात्र, आता ही कामे सुरू झाली आहेत. खडसेंनी आजपर्यंत काही केले नाही. त्यामुळे मी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

The post आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा appeared first on पुढारी.

Exit mobile version