आता ग्रामीण भागातही प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड! वधू-वरांची नैसर्गिक पर्यटन स्थळांना पसंती

कळवण (नाशिक) : आपला विवाह सोहळा अविस्मरणीय राहावा, यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करतात. विवाह सोहळ्यासोबतच नवदांपत्याच्या लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील अल्बममध्ये एकत्रित असाव्यात, यासाठी सध्या प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड जोरात आहे. यासाठी ग्रामीण भागातील नैसर्गिक पर्यटन स्थळांना पसंती दिली जात आहे. 

तरुणाईचा उत्साह वाढला

विवाहाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणींच्या स्वरूपात जपण्यासाठी कॅमेऱ्यात कैद केला जातो. हल्लीच्या जमान्यात विवाहपूर्वीच्या आठवणीही कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी प्री-वेडिंग शूटची पद्धत सुरू झाली आहे. कळवण परिसरातील चणकापूर व पुनंद धरण, देवळीकराड हेमाडपंथीती मंदिर, सप्तशृंगगड, मार्कंडेय पर्वत तसेच सुरगाणा, हतगड, सापुतारा अशा निसर्गरम्य ठिकाणी फोटोग्राफी केली जात आहे. कोरोनामुळे लग्नसराईचा हंगाम ठप्प झाला होता. या काळात छोटेखानी विवाह सोहळे झाले. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना विवाह सोहळ्यात तरुणाईचा उत्साह वाढला आहे. 

या लोकेशनला पसंती

विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधू-वरांची प्री-वेडिंग फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे. शहरी भागातील वधू-वरांकडून ग्रामीण भागातीळ शेती, नदी, नाले, तळे आणि किल्ल्यांचा परिसर, धरण यांच्या लोकेशनला पसंती दिली जात आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्वक्षण साठविण्यासाठी प्री-वेडिंग शूट केले जात आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

पूर्वी केवळ मांडव आणि लग्नात छायाचित्र काढले जायचे. सध्या फोटोग्राफीत अनेक बदल झाले असून, लग्नापूर्वी कँडिड फोटोग्राफी, प्री-वेडिंग फोटोग्राफी, पोस्ट वेडिंग फोटोग्राफी केली जाते. यासाठी जवळच्याच नैसर्गिक ठिकाणांना पसंती दिली जाते. - रोशन ठाकूर, वेडिंग फोटोग्राफर, कळवण 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप