आता नाशिकमध्येच दररोज १० हजार स्वॅब टेस्टिंग; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक :  पुणे व औरंगाबादच्या प्रयोगशाळेतून कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसत आहे. त्यामुळे आता नाशिक जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या बिटको रुग्णालयात प्रत्येक पाच हजार स्वॅब टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मार्चअखेर नाशिकमध्येच रोज दहा हजार स्वॅबचे नमुने मिळणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

मांढरे म्हणाले, की त्याकरिता यंत्रसामग्री बसविण्यात येत असून, स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. सध्या नाशिकमध्ये दररोज हजार ते तेराशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला असून, स्वॅब टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु स्वॅब टेस्टिंगला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आता जिल्हा रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात नवीन यंत्रसामग्री बसविण्यात येत आहे. सध्या लॅब उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, नाशिकमधील रुग्णांच्या स्वॅबची आपल्याच जिल्ह्यात चाचणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या दोन लॅबमधून दररोज दहा हजार स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू