आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

येवला (नाशिक) : आपल्या गावाला कोणत्या प्रवर्गाचा सरपंच लाभणार इथपासून तर आरक्षण सोडत निघाल्यावर निवडणूक लढवायची की नाही हे ठरवू असे नियोजन असलेल्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत.

मागील पाच वर्षांसाठीचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची मुदत संपल्याने आता २०२० ते २०२५ या पाच वर्षांसाठी पुन्हा नव्याने सरपंचपदाचे आरक्षण १४ तारखेला ठरणार होते. मात्र शुक्रवारी (ता. ११) निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ग्रामविकास विभागाने सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रमही पुढे ढकलला आहे. यामुळे १४ तारखेला जिल्हाभर होणारी सोडत स्थगित झाली असून, ही सोडत आता १५ जानेवारीनंतर होणार आहे. 

सरपंच कोणत्या प्रवर्गाचे?

राज्यात बहुतांश ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडतीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. २०२० ते २०२५ या पाच वर्षांसाठी जिल्ह्यांमध्ये निवडणूकपूर्व सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम १४ तारखेला सर्व तहसील कार्यालयांमध्ये होणार होता. मात्र निवडणूक आयोगाने शुक्रवारी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. या आदेशानंतर लागलीच ग्रामविकास विभागानेही आदेश काढून सरपंच आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचे सरपंच कोणत्या प्रवर्गाचे हे निवडणुकीनंतरच ठरणार आहे. आता ही आरक्षण सोडत निवडणूक झाल्यावर १५ जानेवारीनंतर राबविण्यात यावी, असे शासनाने सुचविले आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

इच्छुकांचा हिरमोड

जिल्हाधिकारी कार्यालयाने निकषानुसार केलेल्या आराखड्यात ३८२ ग्रामपंचायतींची खुर्ची अनुसूचित जाती-जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव, तर १२८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी निश्‍चित होणार होते. यात कोणती ग्रामपंचायत कोणासाठी हे सोडतीतून ठरले असते. पण आता गावाचा सरपंच कोण होणार हे माहीत नसल्याने या खुर्चीवर डोळा असलेल्यांना पहिले सदस्यपदाच्या खुर्चीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, सरपंचपद आरक्षित असलेल्या वॉर्डातील लढतींना विशेष महत्त्व येणार होते पण आता तसेही चित्र असणार नाही. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा