आता ‘मंडणगड पॅटर्न’नुसार जातप्रमाणपत्र पडताळणी, राज्य शासनाचा निर्णय

जातप्रमाणपत्र पडताळणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या काही दिवसांवर इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा येऊन ठेपल्या असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी कागदपत्रांची जमविताना विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत मंडणगड पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि ‘बार्टी’ महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मंडणगड पॅटर्न राबविले जात आहे. नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे येवला तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जातप्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोडल अधिकाऱ्यांची भूमिका, महाविद्यालयाची भूमिका, कागदपत्रे पूर्तता निकष आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर घेण्याचे नियोजन सुरू आहे. या माध्यमातून विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

The post आता 'मंडणगड पॅटर्न'नुसार जातप्रमाणपत्र पडताळणी, राज्य शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.