आता मृत्यूनंतरच करणार का रस्त्याची दुरुस्ती?  मनमाडच्या नागरिकांच्या स्वत:ला गाडून घेण्याचा इशारा 

मनमाड (जि.नाशिक) : शहरातील शांतीनगर भागाकडे जाणारा रस्ता अपघात पॉइंट बनला असून, रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने गुडघ्याएवढे खड्डे पडून अनेकांचे अपघात झाले आहेत. यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यावरच रस्ता दुरुस्ती करणार का? असा संतप्त सवाल शांतीनगरच्या रहिवाशांनी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे विचारला आहे. तसेच आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास खड्ड्यात गाडून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 

खड्ड्यात गाडून आंदोलनाचा इशाराही

शहरातील करुणा हॉस्पिटलजवळून शांतीनगरकडे जाणारा रस्ता गोपाळनगर, नेहरूनगर, श्रावस्तीनगर, स्वामी जनार्दननगर, वेलकणीनगर, बापूनगर, नगर चौकी आदी भागांना जोडणारा एकमेव रस्ता असून, सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चार वर्षांपासून या रस्त्यावर गुडघ्याएवढे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे पाणी साचते. खड्ड्यात वाहने आदळून अनेक अपघात झाले आहेत. शहर व या भागांना जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने रहदारीचा दुसरा मार्ग नाही. रेल्वेने सर्वत्र संरक्षण भिंत उभारल्यामुळे जाण्या-येण्यास व वाहतुकीस हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या, मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची संतप्त भावना महिलांसह वृद्धांनी बोलून दाखवली. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

मनमाडच्या शांतीनगरवासीयांचा संतप्त सवाल

अपघातांमुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. खड्ड्यात वाहने आदळत असल्याने गाड्या खराब होत आहेत. पायी चालतानाही खड्ड्यात पाय गेल्यास फ्रॅक्चर होते, इतकी खराब परिस्थिती रस्त्याची झाल्यामुळे या भागातील नागरिक हैराण आहेत. या रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा रस्त्यावर खड्डे करून त्यात पुरून घेऊन आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल निरभवणे, संजय कटारे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अनिल सोनार, बी. के. जंभोरे, एम. डी. मानेकर, हरी दराने, सूर्यवंशी मिस्तरी, सी. ए. काशीकर, विलास भावसार, लकी सिरम, दीपक जाधव, तेजस खाटिक, नारायण शेलार, रमेश आवारे, दिलीप सूर्यवंशी, पसाटे सर, संजय घुले, श्रीहरी गुंजाळ यांच्यासह सुमारे दीडशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..