आता वाद टळणार अन् वेळही वाचणार! १०९ गावातील गावठाणचे थेट ड्रोनद्वारे सर्वेक्षण 

येवला (जि. नाशिक) : वाढते शहरीकरण व यांत्रिकीकरणामुळे नापिक व वर्षानुवर्षे पडीक जमिनी लागवडीखाली आल्याने बांधाचे व हद्दीचे वाद तसेच भाऊ हिस्सा वाद निर्माण होऊ लागले आहेत. हे वाद उपलब्ध अभिलेखांच्या आधारे सोडवण्याचे प्रयत्न भूमिअभिलेख विभागाद्वारे होत आहेत.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक गावातील गावठाण जमिनीचे मोजमाप होणार आहे. याची पूर्वतयारी सुरू झाली असून, भूमिअभिलेख विभागाकडून १ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पारेगाव येथून ड्रोन कॅमेऱ्यामार्फत मोजमाप सुरू होणार असल्याची माहिती भुमिअभिलेख उपअधीक्षक संजय राजपूत यांनी दिली. 

जागामालकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

तालुक्यातील १०९ गावातील गावठाण जमिनीचे मोजमाप ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जमिनीचे आणि घराचे डिजीटल प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येईल. या गावठाण मोजणीसाठी ग्रामसेवकांची देखील मदत घेण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरा मोजणीनंतर प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते, घर, इतर जागांचे प्रॉपर्टी कार्ड बनवून जागामालकांना ते दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्या जागेचे क्षेत्रफळ निश्‍चित केले जाईल. प्रॉपर्टी कार्डमुळे बँकांकडून कर्ज घेण्यासाठी कार्डधारकाला मदत होणार असल्याने प्रॉपर्टी कार्डला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच गावठाण भागातील नदी, नाले, रस्ते यांचीही ड्रोन कॅमेऱ्यामार्फत नोंद केली जाणार असून, त्याची माहिती देखील मिळणार आहे. या मोजणीसाठी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख महेशकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 
याप्रसंगी शिरस्तेदार मुजफ्फर शेख, मुख्यालय सहाय्यक गणेश भागवत व कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

वेळेची बचत होणार... 

अधिक सूक्ष्म अभिलेख मिळण्यासाठी आता ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाचे काम पूर्वी जुन्याच पद्धतीने होत असल्याने त्याला खूप वेळ लागायचा. शिवाय मनुष्यबळ जास्त लागायचे व खर्चही व्हायचा. जुन्या मोजणी पद्धतीमध्ये विविध भागांचे नकाशे व दस्तावेज सोबत घ्यावे लागायचे. हे काम सुरू असताना नागरिक व भूमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांमध्ये वादही होत असत. तसेच सर्वेक्षणासाठी जास्त वेळही लागत असल्याने आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणामुळे वेळेची बचत होणार आहे व जमीन मोजणी कार्यक्रमात सु:सूत्रता येणार असल्याचे भूमि अभिलेखच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल