आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार : गुलाबराव पाटील

आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, यावरून आता बंडखोर आमदारांना सर्वत्र टीका होऊ लागली आहे. आपल्यावर होत असलेल्या टीकेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलयं. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून, त्यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर भाषणातून निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.

आम्ही शिंदे बाबा के चालिस आमदार…

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून विचारांचे वारसदार नाहीत. तसेच आपण अलिबाबा चालिस चोर प्रमाणे शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत. हा ३२ वर्षांचा मुलगा येतो आणि आमच्यावर टीका करतो, त्याला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत असा एकेरी उल्लेख पाटलांनी केला.

आमचा भाजपशी प्रेमविवाह…

पुढे पाटील म्हणाले की, शिवसेना कुणाची हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. शिवसेना आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं म्हणून आम्ही आय लव यू म्हटले, बाकी काय केले. त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आम्ही बाळासाहेबांनी, दिघेंना सोडलेले नाही, पक्षही सोडले नाही असे पाटील म्हणाले.

The post आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.