आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव येथे भगर भरडणी यंत्र कार्यान्वित

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव येथे भगर भरडणी यंत्र सुरू करण्यात आलेले आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात भातासह भगर, नाचणी, वरी, सावा, बर्टी, भादला ही प्रमुख पिके घेतली जातात. भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने हाताद्वारे श्रमाने भात काढणी करणे कठीण असते. म्हणून भात काढण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो.

परंतु त्या मानाने कमी प्रमाणात घेतली जाणारी भगर, नाचणी, वरी, राळा, बर्टी ही पारंपारिक पिके पद्धतीने उखळ आणि मुसळ वापरून ही तृण धान्ये खाण्यासाठी तयार केली जातात. मात्र ते खूप श्रमाचे व थकव्याचे काम असते. मानवी श्रम कमी होऊन ही पिके सुद्धा यंत्राने तयार करता यावी यासाठी मोहगाव येथील युवक उमेश देशमुख याने अशी तृण धान्य काढणीसाठी यंत्र उपलब्ध केले आहे. पिंपळनेर पासून वरच्या पट्टयात संपूर्ण आदिवासी क्षेत्रात भगर, नाचणी, सावा, राळा, वरी, बर्टी आदी तृणधान्य पिके भरडण्यासाठी यंत्र उपलब्ध झाल्याने लोकांचे हस्तश्रम कमी होऊन वेळ सुद्धा वाचणार आहे.

मागील वर्षी कृषी विभागाकडून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करताना तृण धान्यपिक पिकविण्यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानुसार या तृणधान्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यतः भगर, नाचणी आदी पिकांची यंत्राद्वारे काढणी करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

हेही वाचा: