आदिवासी भागातील शिक्षकांचे प्रश्‍न अग्रक्रमाने सोडविणार – आमदार खोसकर

घोटी (नाशिक) : आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वांत पुढे राहत, विधानसभेत प्रश्‍न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार हिरामण खोसकर यांनी रविवारी (ता. 24) दिली. 

विधानसभेत प्रश्‍न मांडणार

देशात दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, गरीब वा श्रीमंत असो अथवा विविध जातिधर्माचे विद्यार्थी, अशा सर्वांना वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्राथमिक शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांनी जी दृष्टी दिली, त्यामुळे देशात अनेक युवक मोठमोठ्या पदांवर कार्यरत झाले. आपण बेरोजगारीवर मात आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू शकलो. शिक्षक केवळ ज्ञानदानाचे काम करत नाही, तर तेथील स्थानिक जनतेचे प्रश्‍न शासनदरबारी नेत न्याय देण्याचे कामदेखील आपले शिक्षक करतात. त्यामुळे आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वांत पुढे राहत, विधानसभेत प्रश्‍न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

 संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात 

महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी (ता. २४) सिन्नर-घोटी महामार्गावरील उंबरकोन फाटा येथे झाले. त्या वेळी आमदार खोसकर बोलत होते. निवृत्ती तळपाडे अध्यक्षस्थानी होते. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशीनाथ मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विठ्ठल लंगडे व्यासपीठावर होते. संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना या वेळी नियुक्तिपत्र देण्यात आले. ज्ञानेश्‍वर भोईर यांनी प्रास्ताविक केले. राजाराम इदे यांनी सूत्रसंचालन केले. नवनियुक्त तालुकाध्यक्ष भावराव बांगर यांनी आभार मानले.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच