आदिवासी विकासची मेगाभरती! २१६ पदे रिक्त; ३१ एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत 

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर ३१ एप्रिल २०२१ पर्यंत शिक्षकांपासून प्राचार्यांची २१६ पदांसाठी अर्ज करता येतील. 

१४ एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू होणार
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २५ शाळा चालविण्यात येतात. इथे सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. त्यातून सध्या सहा हजारांपेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात राज्यात १४ एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू होणार आहेत. यंदा केंद्राकडून राज्यात या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर पदवीधारक शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ३१ मार्चपासून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

भरती होणारी पदे अशी 

प्राचार्य- १६, उपप्राचार्य- ८, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (इंग्रजी, भौतिकशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, वाणिज्य)- २८, पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र)- १६४. भरतीसाठी तीन तासांची लेखी परीक्षा मे २०२१ च्या शेवटच्या अथवा जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी इंग्रजी आणि हिंदी हे माध्यम असून, परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यात नवीन १४ एकलव्य मॉडेल निवासी शाळा जून २०२१ पासून सुरू होणार आहेत. या शाळांमधील भरतीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी योगदान द्यावे. 
-हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग