आदिवासी विद्यार्थ्यांचे नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे नववी ते बारावीचे वर्ग येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्यामध्ये सरकारी-अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा आणि सरकारी वसतिगृहांचा समावेश आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांकडून लेखी संमती घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 

पालकांकडून लेखी संमती घेण्याचे बंधनकारक

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात ‘अनलॉक लर्निंग’ प्रकल्प राज्यभर राबविण्यात आला आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २३ ते २९ नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहात हात धुण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर-गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदी अत्यावश्‍यक वस्तूंसाठी गृहपाल तथा मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखालील समितीने शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून खर्च करायचा आहे. वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण निश्‍चित करायचे आहे. क्वारंटाइन सेंटर इतरत्र हलवणे शक्य नसल्यास शाळा खुल्या अथवा इतर ठिकाणी भरवायची आहे. वर्गखोल्या आणि शिक्षकांच्या खोल्यांमधील बैठकव्यवस्थेत शारीरिक अंतर ठेवण्यात यावे. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी, याप्रमाणे नावानिशी बैठकव्यवस्था करायची आहे. 
 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी 
घरी राहून अभ्यास शक्य 
आश्रमशाळा-वसतिगृहाच्या अंतर्गत व बाह्य भागात रांगेत उभे राहताना सहा फूट अंतर राखले जाईल, यासाठी चौकोन अथवा वर्तुळ आखून घ्यायचे आहे. मात्र परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा अथवा गर्दीचे कार्यक्रम होणार नाहीत. आजारी मुलांना पालकांनी आश्रमशाळेत अथवा वसतिगृहात पाठवू नये. पालकांच्या संमतीने घरी राहून विद्यार्थी अभ्यास करू शकतील. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनासाठी विशिष्ठ योजना आदिवासी विकास आयुक्तांनी तयार करायची आहे. आश्रमशाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्ण उपस्थितीसाठीची पारितोषिके बंद करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

सरकारी-अनुदानित आश्रमशाळा अन् एकलव्यसह सरकारी वसतिगृहांचा समावेश 
- एका दिवशी ५० टक्के विद्यार्थी वर्गात आणि ५० टक्के विद्यार्थी अनलॉक लर्निंग वर्गात 
- वर्गात गणित, विज्ञान, इंग्रजीविषयक शिकवायचे आणि इतर विषय अनलॉक लर्निंगमध्ये शिकवले जाणार 
- शिक्षक, कर्मचारी अथवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवायचे 
- चिंता आणि निराशा अशा मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदवणे यासाठी समुपदेश केले जाणार 

नववी ते बारावी विद्यार्थ्यांची संख्या 
आश्रमशाळा मुले मुली एकूण 

सरकारी ३० हजार २१० ३२ हजार ५६७ ६२ हजार ८६७ 
अनुदानित ३८ हजार ३०० २८ हजार ७० ६६ हजार ३७० 
एकलव्य एक हजार ४१० एक हजार ३६२ दोन हजार ७७२ 
एकूण ६९ हजार ९२० ६२ हजार ८९ एक लाख ३२ हजार नऊ 

सरकारी ४४८ आश्रमशाळांतील निवासी विद्यार्थी 
वर्ग निवासी विद्यार्थी 
मुले मुली 

नववी सात हजार ५७३ आठ हजार ६७ 
दहावी सहा हजार ८४८ सात हजार ३३९ 
अकरावी कला दोन हजार १०५ दोन हजार २९१ 
अकरावी विज्ञान एक हजार ४५७ एक हजार ५६४ 
बारावी कला एक हजार ७६५ दोन हजार १३९ 
बारावी विज्ञान एक हजार ६० एक हजार २६५ 
एकूण २० हजार ८०८ ३२ हजार ६६५ 
(अनिवासी मुले नऊ हजार ४०२ आणि नऊ हजार ९९२ मुली आहेत.)