आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ; ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत ध्येयाकडे यशस्वी वाटाचाल

नाशिक : डॉक्टर, अभियंता होण्यासाठी ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत यशस्वीरीत्या यशाची एक पायरी चढली आहे. 

काय आहे उपक्रम?

राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे असते. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा इच्छा असूनही अशा विद्यार्थ्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीतील ज्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित एम्स आणि आयआयटी या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेत २०१९ मध्ये सुपर ५० हा उपक्रम सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, अशांसाठी २०१९ मध्ये विभागामर्फत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक प्रवेश परीक्षा घेतली गेली. त्यातून उत्तीर्ण झालेल्या ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. राज्यातील निवड झालेल्या सर्व ५० विद्यार्थ्यांना वाघाड (जि. पालघर) येथील पेस आयआयटी ॲन्ड मेडिकल संस्थेमार्फत अकरावीत प्रवेश देण्यात आला असून, पुढील दोन वर्षे अभ्यासक्रमासह त्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ प्रवेश पात्रता अभ्यासक्रमाचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत केला जात आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

कोरोनाकाळातही ऑनलाईन शिक्षण

दरम्यान, या ५० विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे, तर २६ विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. अकरावी अभ्यासक्रमासह या विद्यार्थ्यांना इतर स्पर्धा परीक्षेतही सहभाग नोंदवत आपल्या गुणवत्तेच्या आधारावर यश संपादित केले आहे. संस्थेमार्फत या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा दर महिन्याला विभागास कळविला जात आहे. कोरोनाकाळातही अभ्यासक्रमात खंड पडू नये म्हणून संस्थेमार्फेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅबलेट व पुस्तके देण्यात आली. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

‘सुपर ५०’ उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे डॉक्टर, अभियंता होण्याच्या स्वप्नास बळ मिळणार आहे. दोन वर्षांच्या या उपक्रमाचे एक वर्ष पूर्ण झाले असून, विद्यार्थीदेखील आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थ्यांना यश मिळाल्यानंतर भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ करण्यासाठी विभाग नक्कीच प्रयत्नशील राहील. 
-विलास पानसरे, सहआयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक