आदेश काढण्याचा प्रकार मनसेच्या अंगलट! गितेंच्या मिसळ पार्टीला आदेश झुगारून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांची गर्दी 

नाशिक : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. १) झालेल्या मिसळ पार्टीला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.  गिते यांचे राजकारणातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. ‘पार्टीला जाल, तर याद राखा़,’ असा सज्जड दम देऊनही मनसेचेच सर्वाधिक पदाधिकारी उपस्थित राहिल्याने आदेश काढण्याचा अघोरी प्रकार अंगलट आला. श्री. गिते यांनी आपण कुठल्या पक्षात जाणार नसल्याचे यानिमित्त सांगितले असले तरी त्यांच्या पक्षांतराचीच चर्चा अधिक होती. 

गितेंच्या मिसळ पार्टीला गटबाजीचा ढसका 
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गिते अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालून आली असतानाही त्यांनी नकार देत भाजपमध्येच राहाणे पसंत केले होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यापूर्वीचे हेवेदावे सोडून सर्वांसाठी नववर्षाचे निमित्त साधत मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले वगळता भाजपचे पदाधिकारी उशिरा आले. त्यापूर्वी शिवसेनेच्या सर्वाधिक नेत्यांनी गिते यांची गळाभेट घेतली. काँग्रेसच्या निवडक, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित भेट घेत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.भाजपच्या नेत्यांनी पार्टी सुरू झाल्यानंतर दीड तासांनी हजेरी लावली.

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

आमदार फरांदे, ढिकलेंची अनुपस्थिती; आदेश झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी 

महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते सतीश सोनवणे, लक्ष्मण सावजी, माजी महापौर रंजना भानसी, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते. त्यापूर्वी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी मंत्री बबन घोलप, काँग्रेसचे शरद आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

फरांदे, ढिकलेंची गैरहजेरी 
आमदार सीमा हिरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. आमदार फरांदे व ढिकले यांची गैरहजेरी चर्चेत होती.  गिते यांच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना निमंत्रित गेले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वपक्षीय पार्टी होती, तर दोघांना निमंत्रणे न देण्यामागे पार्टीचा उद्देश सफल न होता कुठला तरी हेतू मनात ठेवून नियोजन केल्याची चर्चा होती. निवडणुकीपूर्वी हेवेदावे विसरून गिते यांच्या घरी पोचलेल्या आमदार फरांदे यांनीही गितेंच्या मिसळ पार्टीला तेवढी हिंमत दाखविली नसल्याची चर्चा होती. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

मनसेचे पदाधिकारी झाडून हजर 
मनसेचे जिल्हाप्रमुख दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह दुसऱ्या फळीतील सर्वच पदाधिकारी झाडून हजर राहिले. आदल्या दिवशी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम यांनी ‘पार्टीला गेल्यास याद राखा’, असा इशारा दिला होता. मात्र, तो इशारा फोल ठरला. प्रदेश पातळीवरून आदेशच आला नसल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्थानिक दोन- तीन नेत्यांनीच आपसांत चर्चा करून असे आदेश काढल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता नसणारे ईचम यांची आदेश काढण्याची हिंमत नाही. नाशिकस्थित प्रदेश पातळीवर कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून आदेश देण्याचा उद्योग झाल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे अनेकांना भेटता आले नाही. नववर्षाचे निमित्त साधून सर्वपक्षीय मिसळ पार्टी आयोजित केली. पक्ष बदलण्याचा कुठलाच विचार नाही. भाजपने भरपूर दिले. -वसंत गिते, माजी आमदार