आधारकार्ड लिंकच्या नावाखाली लाभार्थी वंचित! गरजू ग्राहकांवर उपासमारीची वेळ

जुने नाशिक : आधारकार्ड लिंक केले नाही, तर धान्य मिळणार नाही असे प्रकार काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून केले जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यातून लाभार्थी आणि दुकानदार यांच्यात वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत. 

स्‍वस्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याचे आधारकार्ड लिंक करून घेण्याच्या सूचना धान्य वितरण विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहेत. त्यासार दुकानदार ग्राहकांना आधार लिंक करण्यास सांगत आहेत. यापूर्वी बहुतांशी ग्राहकांनी लिंक केले आहे. तरी पुन्हा लिंक करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधारकार्ड लहानपणीचे असेल तर त्यांचे अपडेट करून पुन्हा लिंक करण्यास सांगितले जात आहे. लिंक नसेल तर धान्य मिळणार नाही, अशी भूमिका काही दुकानदारांनी घेतली. त्यामुळे बहुतांशी ग्राहकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या कोरोना महामारी आहे. अनेकांचे हातचे काम गेले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशात आता स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य मिळाले नाही तर गरजू ग्राहकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने आधारकार्ड लिंक नसेल तरी धान्यापासून कुणास वंचित ठेवू नये, असे आदेशित केले आहे. तरीदेखील सध्या असे प्रकार सुरू आहेत. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

काँग्रेस सेवादलाचे निवेदन 

गरजू ग्राहकांना धान्यापासून वंचित ठेवू नये, आधार लिंक नसल्याच्या नावाखाली दुकानदारांचा कोठाही कमी करू नये, अशा मागणीचे निवेदन नाशिक शहर काँग्रेस सेवादलातर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष वसंत ठाकूर, धोंडिराम बोडके, संतोष ठाकूर, हेमंत परदेशी आदी उपस्थित होते. 

आधारकार्ड लिंक नसणाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित ठेवू नका, तसेच दुकानदारांचा कोठा कमी करू नये. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, याची दक्षता घ्यावी. 
-वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, काँग्रेस सेवादल  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO