आधीच गॅस सिलेंडरची दरवाढ; त्यात डिलिव्हरी बॉयची पैशांची मागणी! ग्राहकांमध्ये खटके 

नाशिक : गॅस सिलिंडरच्या दराने एक हजार रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. वाढलेल्या दरात गॅस सिलिंडर घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यात डिलिव्हरी बॉय घरपोच डिलिव्हरीच्या नावाखाली सिलिंडरच्या दराव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम घेत ग्राहकांची पिळवणूक करत आहे. त्यातून अनेक वेळा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांमध्ये खटके उडून वाद होत आहे. 

सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ

इंधन दरवाढीप्रमाणे गॅस सिलिंडरचे दर आकाशाला भिडत आहेत. ८२३ ते ८५० रुपये दरात ग्राहकांना सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. सरकारकडून देण्यात येणारी सबसिडीही बंद झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. येत्या काही दिवसांत सिलिंडरचे दर हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून नागरिकांची छळवणूक सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यात डिलिव्हरी बॉयही मागे नाहीत. त्यांच्याकडून ग्राहकांचा चांगलाच छळ सुरू आहे. गॅस एजन्सीतर्फे ग्राहकांना घरपोच सिलिंडर पोचविण्यासाठी वेतन दिले जाते. असे असतानाही ते ग्राहकांकडून २० ते ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेततात. सिलिंडर घरपोच करण्यासाठी मजुरी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

डिलिव्हरी बॉयचा ठराविक रकमेस घेऊन आग्रह

काही दिवसांपूर्वी सिलिंडरचे दर ३०० ते साडेचारशे, पाचशे रुपयांपर्यंत होते. तसेच सरकारतर्फे सबसिडीही मिळत होती. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला दहा रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम देणे शक्य होते. परंतु, सध्या दरही वाढले असून, सबसिडीही मिळत नाही. त्यात कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. सर्वांनाच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांतील डिलिव्हरी बॉय ठराविक रकमेस घेऊन आग्रह धरत असल्याने बऱ्याचदा पैसे देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये खटके उडत आहेत. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

गॅस सिलिंडरचे गगनाला भिडणारे दर सरकारने कमी करावेत, तर गॅस एजन्सी चालकांनी सिलिंडर घरपोच पोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची होणारी छळवणूक थांबवावी. 
- नासीर पठाण (ग्राहक)