‘आधी श्‍वेतपत्रिका काढा; नंतरच महापालिका गहाण ठेवा!’ महापौरांच्या टीकेला शिवसेनेचे उत्तर

नाशिक : विकासकामे करायची असतील, तर पैसा लागेल. मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढले जात असल्याचे समर्थन सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे, तर महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे विवेचन करण्यासाठी ‘आधी श्‍वेतपत्रिका काढा, त्यानंतरच कर्ज घेऊन महापालिका गहाण ठेवण्याचे धाडस करा’, असे थेट आव्हान विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सोमवारी (ता. १८) दिले. 

महापौरांच्या टीकेला शिवसेनेचे उत्तर 

गेल्या आठवड्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असता, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांनी विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची परवानगी मागितली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. शिवसेनेने कर्ज काढण्यास विरोध केल्यानंतर महापौर कुलकर्णी यांनी शिवसेनेचा असमंजसपणा असल्याचा आरोप करताना मेट्रो निओ व जिल्हा परिषद स्टेडियमच्या जागेवर वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव शासनाने अडकविल्याने आधी त्या समस्या सोडविण्याचे आव्हान दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. महापौर कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे शिवसेनेवर आरोप करताना विचार करावा. 

‘खोटे बोला, पण रेटून बोला’ ही भाजपची भूमिका

महामेट्रोचा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. केंद्रानेच अद्यापही प्रकल्प मंजूर केलेला नाही. ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ ही भाजपची कायम भूमिका राहिली आहे. शिवसेनेने मेट्रो प्रकल्प कुठे अडविला, याचे पुरावे द्यावेत. नंतरच आरोप करावेत, असे आव्हान श्री. बोरस्ते यांनी दिले. दत्तक नाशिकचा एकही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यात विकासकामांसाठी आणखी कर्ज घेऊन नाशिकला खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी कर्ज काढण्यास हरकत नाही. उगाच कुठल्याही कामांसाठी कर्ज काढून नाशिककरांना खाईत ढकलू नये. स्मार्टसिटी कंपनीकडे महापालिकेचे सुमारे दोनशे कोटी रुपये पडून आहेत. आधी तो निधी वसूल करावा. विकासकामांच्या आड शिवसेना येते, हा आरोप अडाणीपणाचा आहे. वाहनतळाचा प्रस्तावच अद्याप आलेला नाही. जिल्हा परिषदेच्या मैदानावर उपक्रम घेणे म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

महापालिका भाजपची प्रॉपर्टी नव्हे 

शिवसेनेला विकासकामांसाठी निधी नको असेल, तर तसे पत्र सदस्यांनी द्यावे, असे महापौर कुलकर्णी यांनी म्हटले होते. त्यावर बोरस्ते यांनी महापालिका भाजपची प्रॉपर्टी नसल्याचे उत्तर दिले. महापौर भाजपची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढत नसल्याचे ते म्हणाले. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना