आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी

आनंदाचा शिधा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनापूर्वी गृहिणींना गोड पदार्थ तयार करता यावे, यासाठी महिना अखेरपूर्वी आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबत पुरवठा विभागाला मागण्यांचे निवेदन सादर केले.

राज्यातील जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या धर्तीवर यंदाही शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये या शिध्याचे किट वितरित केले जाणार आहे. शासनाने यंदा आनंदाचा शिधा संचामध्ये एक लिटर पामतेल, एक किलो साखर, प्रत्येकी अर्धा किलो रवा, भाजके पोहे, चनाडाळ व मैदा देण्याचे घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर रेशन दुकानदार संघटनेने पुरवठा विभागाला निवेदन दिले.

निवेदनामध्ये गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने गेल्यावर्षीपासून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मागील वर्षी पहिल्यांदाच दिवाळीत हा शिधा वितरित करण्यात आला. दिवाळीपूर्वी तो घरोघरी पोहोचणे अपेक्षित असताना दिवाळी संपूनही अनेक लाभार्थींपर्यंत तो पोहोचलेला नव्हता. चालू वर्षी गुढीपाडव्यालादेखील आनंदाच्या शिध्याबाबत सर्वसामान्यांना हाच अनुभव आला. गत अनुभव लक्षात घेता ३१ ऑक्टोबरपूर्वी आनंदाच्या शिध्याचे किट व दरमहा रेशन लाभार्थींना वितरित करावे लागणारे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी रेशन दुकानदारांनी केली आहे.

हेही वाचा :

The post आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी appeared first on पुढारी.