आमदारांच्या नावाने वसुली; स्वयंघोषित नेत्याला दस्तुरखुद्द आमदारच त्रस्त

घोटी (नाशिक) :  "माझ्या शब्दाबाहेर आमदार जाणार नाहीत. माझे काम करून न दिल्यास मी थेट आमदारांकडे तक्रार करत तुमचा कार्यक्रम लावून टाकेन," अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी धमकी एका स्वयंभू नेता म्हणविणाऱ्या अवलियाकडून देण्यात येत आहे.

स्वयंघोषित नेत्याला दस्तुरखुद्द आमदारच त्रस्त
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नावाखाली शासकीय अधिकारी, नागरिकांकडे वसुलीच्या धमकी देणाऱ्या स्वयंघोषित नेत्याला दस्तुरखुद्द आमदारच त्रस्त झाल्याचे पुढे आले आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हा आदिवासी मतदारसंघ आहे. आमदारांना निवडणुकीदरम्यान मी हजारो मतदान मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केल्याचे सांगत, माझ्या शब्दाबाहेर आमदार जाणार नाहीत. माझे काम करून न दिल्यास मी थेट आमदारांकडे तक्रार करत तुमचा कार्यक्रम लावून टाकेन, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी धमकी एका स्वयंभू नेता म्हणविणाऱ्या अवलियाकडून थेट अधिकारी, नागरिकांना दिली जात असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

स्वयंघोषित नेत्यावर कारवाईची मागणी

अनेक स्वराज्य संस्था व शासकीय कार्यालये येथे माहिती अधिकार अर्ज टाकून वेठीस धरले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नावाने फसवणुकीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. त्रस्त नागरिकांनी आमदार हिरामण खोसकर यांना प्रत्यक्ष भेटून दूरध्वनी करून तक्रारी केल्या असून, स्वयंघोषित नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

तातडीने कार्यवाही करणार

नावाने कोणीही शासकीय अधिकारी व नागरिकांची दिशाभूल करत धमकी देत असल्यास तातडीने माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा. तीस वर्षांपासून जनतेची सेवा करत असून, अशा घटनांबाबत मी तातडीने कार्यवाही करणार. -हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ