आमदार निधीचे वर्षात मिळणार ५१ कोटी! वाढीव निधीच्या लॉटरीने जिल्ह्याला मोठा फायदा  

येवला (जि.नाशिक) : तब्बल दहा वर्षांनंतर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची वाढ झाल्याने जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. विधानसभा व विधान परिषदेचे जिल्ह्यात १७ आमदार असल्याने वर्षाकाठी ५१ कोटींचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. विशेष म्हणजे, हाच आकडा पाच वर्षांसाठी अतिरिक्त ८५ कोटींवर जाणार असल्याने विकासकामांना नक्कीच मोठा हातभार लागणार आहे. 

जिल्ह्याला याचा मोठा फायदा
आमदार निधीतून शाळाखोल्या, अंगणवाडी केंद्र, व्यायामशाळा, स्मशानभूमी, बस थांबा, शौचालये, नाल्यांवरील फरशा, लहान कोल्हापूर बंधारे आदी कामे केली जातात. स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २०११-१२ या वर्षापासून आमदारांना प्रतिवर्षाला दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात होता. मात्र मध्यंतरीच्या काळात बांधकाम व इतर साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच तयार केलेल्या या विकासकामांची देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज होती. त्यानुसार आता मार्चपासून एक कोटीची वाढ करत तीन कोटींचा निधी आमदारांना मिळणार आहे. मागील महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. या निधीतून नव्याने विकासकामे करण्याला नक्कीच अधिक वाव मिळणार आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

निर्णयाचे आमदारांकडून स्वागत
आमदार निधीतून यापूर्वी करण्यात आलेली कामे किंवा वास्तूंच्या देखभाल व दुरुस्तीलाही प्राधान्य देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या इतर कार्यक्रम योजनेंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या कामांनादेखील अत्यावश्यक व तातडीची देखभाल-दुरुस्ती होण्यासाठी दहा लाखांपर्यंत निधी विशेष बाब म्हणून शासनाच्या पूर्वअनुमतीने देता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे आमदारांनी स्वागत केले आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

विकासाला लागणार हातभार 
जिल्ह्यामध्ये सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्‍चिम, देवळाली, इगतपुरी, नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण असे पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत. तर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक आमदार असून, विभागाचे शिक्षक आमदारपदही नाशिकमध्येच आहे. त्यामुळे विधानसभा व विधान परिषदेचे मिळून सतरा आमदार नाशिकमध्ये असल्याने जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत १७ कोटींची वाढ होऊन ३४ कोटींवरून ५१ कोटींवर पोचणार आहे. तर पाच वर्षांत ८५ कोटीची वाढ होऊन मिळणारा निधी २५५ कोटींवर पोचणार असल्याने विकासाला हातभार लागणार आहे. 

 

नागरिकांकडून सातत्याने विकासकामांची मागणी होत असते. त्यामुळे आमदार निधीत झालेली वाढ स्वागतार्ह आहे. वर्षाला एक कोटींचा निधी वाढल्याने नागरिकांच्या विविध विकासकामांच्या मागणीला न्याय देता येणार आहे. -किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग 

 

...असा मिळणार आमदार निधी 
- विधानसभा आमदार - १५ 
-विधान परिषद आमदार - दोन 
- सध्या मिळणार वार्षिक निधी - ३४ कोटी 
- वाढ झाल्याने मिळणारा निधी - ५१ कोटी 
- पाच वर्षांत वाढणारा निधी - ८५ कोटी 
- पाच वर्षांत मिळणारा एकूण निधी - २५५ कोटी