आमदार फरांदेंना गिरीष महाजनांचा ‘चेकमेट’; खोडे, ताजनपुरे, कुलकर्णी यांची नावे वगळली

नाशिक : स्थायी समितीत आठ सदस्यांची नियुक्ती करताना शहरातील मध्य, पश्‍चिम व पूर्व विधानसभा मतदारसंघात समतोल राखण्यात आला असला तरी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे समर्थक नगरसेवकांची नावे यादीतून वगळत नवीन नावांचा समावेश करून त्यांना चेकमेट देण्यात आला आहे. चंद्रकांत खोडे, अनिल ताजनपुरे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांची नावे वगळल्याने आमदार फरांदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. माजीमंत्री जयकुमार रावल समर्थक माधुरी बोलकर वगळता इतर सात सदस्यांच्या नावाची घोषणा करताना माजीमंत्री गिरीष महाजन यांचे वर्चस्व दिसून आले. 

पूर्व विधानसभा मतदारसंघातून रंजना भानसी व गणेश गिते, पश्‍चिम मतदारसंघातून इंदुमती नागरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर व मुकेश शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून अनिल ताजनपुरे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, त्यांच्या नावावर फुली मारत हिमगौरी आहेर-आडके, योगेश हिरे यांची नियुक्ती करून आमदार फरांदे यांना चेकमेट देण्यात आला. हिमगौरी आडके या भाजप शहराध्यक्ष पदाबरोबरच विधानसभा किंवा लोकसभा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. माधुरी बोलकर यांचे नाव प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडून पुढे करण्यात आले. त्याव्यतिरिक्त सर्व नावे गिरीष महाजन यांनी निश्‍चित केल्याने महाजन पर्व संपल्याची चर्चा यानिमित्ताने संपुष्टात आली आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सदस्य अहमदाबादला 

महापौर निवडणुकीचा अनुभव पाठीशी असल्याने व स्थायीची सत्ता हातून जाऊ नये म्हणून भाजपने नियुक्त होणाऱ्या सदस्यांची बुधवारी (ता.२४) पहाटे अहमदाबादला रवानगी केली. भाजप सदस्यांच्या जोडीला मनसेचे सलीम शेख देखील जाणार असल्याने स्थायी समितीवर भाजपची सत्ता अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नीलेश बोरा किंगमेकर 

बहुमत असूनही महापौर निवडणुकीत सत्ता मिळविताना भाजपच्या नाकेनऊ आले होते. एनवेळी सत्तेचे पारडे पुन्हा आपल्याकडे फिरविण्यात भाजपला यश आले. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत देखील बहुमत असले तरी फाटाफुटीची शक्यता होती. त्यावेळी गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक नीलेश बोरा यांनी पडद्यामागून सुत्रे हलवत महत्वाची भूमिका पार पाडली होती. स्थायी समिती सदस्यांची नावे निश्‍चित करताना पुन्हा बोरा हेच किंगमेकर ठरले आहे. 

सानपांना दे धक्का 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. सध्या त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद आहे. या पदाच्या माध्यमातून सानप यांनी मुलगा मच्छिंद्र यांना स्थायी समिती सभापती पदावर विराजमान करण्याची तयारी केली होती. मात्र, सानप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या नावाचा विचार देखील न झाल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

शिवजयंती शहाणे यांच्या पथ्यावर 

नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती उत्सवावरून सिडकोत राजकीय रणधुमाळी उडाली होती. शिवजयंतीवर शिवसेनेचे वर्चस्व दिसत असताना मुकेश शहाणे यांनी मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय कार्यकर्ते जमवत स्वतंत्र जयंती साजरी करून सेनेला टक्कर दिली होती. त्यांची ताकद वाढविण्याचा भाग म्हणून त्यांना स्थायी समितीत स्थान देण्यात आल्याचे बोलले जात आहे.