आम्हाला ‘नकली’ म्हणणारे तोंडावर आपटले : सुधाकर बडगुजर 

सुधाकर बडगुजर, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून मते दिल्याने हीच शिवसेना ‘असली’ आहे हे सिद्ध झाले असून, आम्हाला ‘नकली’ म्हणणारे सपशेल तोंडावर आपटले आहेत, अशी टीका जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटातर्फे शहरात लाडू व मिठाई वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केल्यानेच महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. गद्दारांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना फोडण्याचे पाप ज्यांनी केले त्यांना आता त्यांची जागा कळून चुकली आहे. केंद्रात एक राज्यमंत्री देऊन भाजपाने या पक्षाची चांगलीच बोळवण केली आहे. न घर का न घाट का अशी शिंदे गटाची अवस्था झाली असून विधानसभा निवडणुकीत हा गट पूर्णतः नामशेष होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नसल्याचा चिमटा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी काढला.

नाशिक : शिवसेना वर्धापनदिनानिमित्त शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर पेढे वाटप करताना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, सचिन मराठे, माजी आमदार योगेश घोलप आदी.

बालसुधारगृहास अर्थसहाय्य

पंचवटीत रामकुंड परिसरातील सांडव्यावरच्या देवी मंदिरात महाआरती व सौभाग्याचे लेणं अर्पण करण्यात आले. शालिमार चौक येथील मध्यवर्ती कार्यालयात श्री सत्यनारायण पूजा, ५९ किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम झाला. बाल सुधारगृहमधील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सातपूर विभागात ज्येष्ठांचा सत्कार व मिठाई वाटप, पाथर्डीफाटा येथे वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम पार पडले. यावेळी मनोहर मेढे, केशव पोरजे, महेश बडवे, सचिन मराठे, प्रथमेश गिते, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, सचिन बांडे, अस्लम मनियार आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा –