माहिती व तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाला चालना देण्यासाठी २००१ मध्ये राज्य सरकारकडून राज्यातील काही निवडक शहरांमध्ये अद्ययावत आणि विकसित अशा आयटी पार्कची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या शहरांमध्ये नाशिकचाही समावेश असून, त्याअंर्तगत अंबड येथे आधुनिक आयटी पार्कची उभारणीही केली. मात्र, अशातही नाशिकमध्ये आयटी पार्कला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांनीच आयटी पार्कच्या चर्चेला हवा दिल्याने, नाशिक आयटी उद्योगांसाठी ‘न्यू डेस्टिनेशन्स’ ठरेल असा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.
उद्योगांसाठी ऑल टाइम फेव्हरेट ठरत असलेल्या नाशिकमध्ये आयटी पार्कची शोकांतिकाच झाली आहे. २००१ पासून नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याची सुरू असलेली चर्चा २०२३ मध्येही कायम आहे. आतापर्यंत आयटी पार्कसाठी अंबड, राजूरबहुला, आडगाव, दिंडोरी-अक्राळे, पुन्हा राजूरबहुला आदी पर्यायांवर चर्चा झाली. त्यातील राजूरबहुला निश्चित मानले जात असून, येथील शंभर एकर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुढील आठवड्यात जागा निश्चितीवर बोर्डाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पार्कमध्ये ५० नामांकित कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अंबडचा आयटी पार्क डब्यात
औद्योगिक विकास महामंडळाने २००२ मध्ये तब्बल २ कोटी २३ लाखांची गुंतवणूक करून अंबड औद्योगिक वसाहतीत ७५२ हेक्टर जमिनीवर सुसज्ज आणि आधुनिक आयटी पार्कची उभारणी केली. आयटी पार्क इमारतीचे क्षेत्रफळ ३०७५ चौरस फूट एवढे असून, ही इमारत दुमजली आहे. येथील गाळे अॅडजस्टेबल आहेत. त्यामुळे एखाद्या कंपनीस जास्त जागा हवी असल्यास अनेक गाळे एकत्र करण्याची सुविधा याठिकाणी आहे. २००३ पासून आजतायागत ही इमारत चक्क धूळ खात पडून आहे. या इमारतीत आयटी उद्योग यावा, यासाठी वारंवार निविदा काढण्यात आल्या; पण येथील गाळ्यांचे चढे दर पाहून आयटी कंपन्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने, हा प्रकल्प डब्यात गेला आहे.
अक्राळे नव्हे राजूरबहुला
उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आयटी पार्क दिंडोरी- अक्राळे येथे होणार असल्याचे जाहीर केल्याने, भाजप-सेनेमध्ये पुन्हा एकदा चढाओढीचे राजकारण दिसून येत आहे. कारण आयटी पार्कसाठी अंबड, आडगाव, राजूरबहुला आदी भागांवर यापूर्वी चर्चा केली गेली. आता नव्याने अक्राळेचा समावेश केला गेल्याने भाजप-सेनेत राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, आयटी पार्क अक्राळे नव्हे तर राजूरबहुला येथेच होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले.
मोठ्या कंपन्यांचे जाळे
नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या सुमारे २५० आयटी कंपन्या असून, या सर्व कंपन्या एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न आयटी पार्कच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र, यासाठी महामंडळाकडून बिल्डिंग उभारली जाणार नसून, प्लाॅट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आयटी पार्क झाल्यास इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा या कंपन्यांकडून नाशिकमध्ये गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.
राजूरबहुला याठिकाणी शंभर एकरांत आयटी पार्क उभारला जाणार आहे. आयटी कंपन्यांना याठिकाणी प्लॉट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दोन ते तीन आठवड्यांत या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
– हेमंत गोडसे, खासदार
निटाच्या माध्यमातून आयटी पार्कसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. काही कंपन्यांशी आम्ही संवादही साधला आहे. नाशिकमध्ये आयटी पार्क झाल्यास मोठ्या कंपन्या नाशिकमध्ये येऊ शकतात.
– अभिषेक निकम, अध्यक्ष, निटा
दिंडोरी अक्राळे येथे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारले जाणार आहे. तर राजूरबहुला येथे आयटी पार्कसाठी प्रयत्न केले जात आहेत. याठिकाणी कंपन्यांना प्लाॅट उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
– नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
हेही वाचा :
- Nashik : नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद
- ‘देव’घरातील सीमा
- माझ्यावर आरोप करण्यासारखे काही नसल्याने असले उद्योग : हसन मुश्रीफ
The post आयटी उद्योगांसाठी नाशिक 'न्यू डेस्टीनेशन' appeared first on पुढारी.