नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात डिफेन्स हब आणि डिफेन्स क्लस्टरची चर्चा सुरू झाली तेव्हांपासूनच अग्रस्थानी असलेल्या नाशिकचे नाव डिफेन्स क्लस्टरमधून अचानक वगळल्याने, नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. उद्योगमंत्र्यांनी डिफेन्स क्लस्टरसाठी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या जिल्ह्यांची घोषणा केली. दरम्यान, डिफेन्स क्लस्टरसाठी नाशिकचा विचार व्हावा, अशा आग्रही मागणीचे पत्र अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना पाठविण्यात आले आहे. (Defense Innovation Hub)
उद्योग मंत्रालयातर्फे पुणे, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेल्या ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ (MSME Defense Expo) मध्ये उद्योगमंत्री सामंत यांनी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारणार असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक, २०१८ मध्येच केंद्र सरकारने कोईमतूरसह नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ (Defense Innovation Hub) तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमआयडीसीला पत्र पाठवून नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला होता. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्यातील नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबादमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारणार असल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व घोषणा झाल्यानंतरही उद्योगमंत्र्यांनी नाशिकला वगळल्याने नाशिक उद्योग क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आयमाने थेट उद्योगमंत्र्यांना पत्र लिहित डिफेन्स क्लस्टरसाठी नाशिकचा विचार व्हावा अशी आग्रही मागणी केली. पत्रात म्हटले की, ‘संरक्षणासाठी आवश्यक साधनसामुग्रीच्या मॅन्युफॅक्चरिंगचा एक बेस विकसित करण्यासाठी १९६४ मध्येच नाशिकमध्ये एचएएलची पायाभरणी केली गेली. त्यामुळे नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टर झाल्यास एचएएलमुळे सुविधांना चालना मिळेल. याशिवाय ‘आत्मनिर्भर भारत’ या मिशनअंतर्गत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेला गती प्राप्त होईल. शहरातील औद्योगिक क्षमतेचा विचार करता नाशिकमध्येच डिफेन्स क्लस्टर उभारले जावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली. (Defense Innovation Hub)
डिफेन्स क्लस्टरसाठी सुरुवातीपासूनच नाशिकचे नाव आघाडीवर होते. एचएएल असल्याने, नाशिकमध्ये क्लस्टर शंभर टक्के उभारले जाईल, असा विश्वास होता. मात्र, अचानकच नाशिकचे नाव वगळले गेल्याने आश्चर्य वाटत आहे. शिर्डीत डिफेन्स क्लस्टर उभारण्यामागचा नेमका उद्देश काय हे देखील स्पष्ट हाेत नाही. – ललित बूब, अध्यक्ष, आयमा.
The post आयमाचे उद्योगमंत्र्यांना पत्र : पुणे, रत्नागिरी, शिर्डी, नागपूरमध्ये होणार क्लस्टर appeared first on पुढारी.