आयुक्तांकडून लेटलतिफांना गुलाबपुष्प; गांधीगिरी करत एक दिवसाची वेतनकपात

मालेगाव (जि. नाशिक)  : महापालिका आस्थापनेवरील ५५ लेटलतिफ कर्मचाऱ्यांना आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुलाबपुष्प देऊन मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत केले. गुलाब पुष्प देत गांधीगिरी करतानाच उशिरा आलेल्या या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश त्यांनी आस्थापना विभागास दिले. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

अन् त्यांनी प्रवेशद्वारातच थाटली खुर्ची 

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करत शनिवार, रविवार सुटी दिली. यानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी केली. मात्र बहुतांश अधिकारी, कर्मचारी सकाळी दहानंतरच कार्यालयात येतात. अधिकारी, कर्मचारी वेळेवर येतात की नाही याची माहिती जाणून घेण्यासाठी कासार शुक्रवारी (ता.२९) सकाळी पाऊणेदहालाच हजर झाले. प्रवेशद्वारातच त्यांनी खुर्ची थाटली. उशिरा कामावर येणाऱ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत करून कामाची वेळ व जबाबदारीचे भान याची जाणीव करून दिली.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

५५ लेटलतीफ सापडले

तत्पूर्वी आयुक्तांनी महापालिका मुख्यालयातील सर्व कार्यालयांना भेट देऊन हजेरी मस्टरची तपासणी केली. यात अनेकजण गैरहजर आढळताच त्यांनी हजेरी मस्टर ताब्यात घेतले. सकाळी दहा ते अकरापर्यंत कासार व आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ अन्वरुलहुदा प्रवेशद्वारातच ठाण मांडून बसले. उशिरा येणाऱ्या ५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३२ कायम तर, २३ मानधन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात अनेक जबाबदार अधिकारीही होते. आयुक्तांनी मास्क न वापरणाऱ्यांना ही तंबी देऊन लगेच मास्क लावायला लावले. या कारवाईच्या वेळी मनपाचे सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आले होते. यामुळे अन्य द्वार व खिडक्यांमधून प्रवेश करण्याचा काहींचा प्रयत्न निष्फळ ठरला. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल